हैदराबाद :भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात 1857 च्या उठावाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला स्वातंत्र्य समर म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते. या स्वातंत्र्य समराचे सेनानी म्हणून तात्या टोपे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तात्या टोपे यांनी 1857 च्या लढ्यात इंग्रजांना पळता भुई कमी केली. इतकेच नाही तर झासीची राणी लक्ष्मीबाईची मदतही केली. मात्र सरदार मानसिंगाच्या विश्वासघातामुळे तात्या टोपेंना 18 एप्रिलला आपले बलिदान करावे लागले. या लेखातून जाणून घेऊ तात्या टोपेंच्या कार्याचा आढावा.
कोण होते तात्या टोपे :रामचंद्र पांडुरंग भट असे तात्या टोपे यांचे नाव होते. त्यांचा जन्म नाशिकजवळील येवल्यात झाल्याने त्यांनी आपल्या आडनावात येवलेकर असा बदल केल्याचा उल्लेख येतो. मात्र त्यांनी टोपे हे उपनाव धारण केल्याबाबत मतमतांतरे आहेत. बाजीराव पेशव्यांनी त्यांना दिलेल्या टोपीमुळे त्यांचे नाव तात्या टोपे पडल्याचे सांगितले जाते. मात्र रामचंद्र पांडुरंग भट यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1814 मध्ये येवल्यात झाला. त्यांचे वडील बाजीराव पेशव्यांच्या नोकरीत असल्याने त्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि झासीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सानिध्यात गेले. पुढे नानासाहेब पेशव्यांनी ग्वाल्हेरवरुन आणलेल्या सैन्याचे सेनापती म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
1857 च्या उठावाचे सेनानी :तात्या टोपे प्रचंड धाडसी असल्याने त्यांनी अगोदर ब्रिटीशांच्या तोफखान्यावर नोकरी केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा बाजीराव पेशव्यांकडे नोकरी पत्करली. 1857 च्या दिल्ली, लखनौ, जगदिशपूर, कानपूर या ठिकाणच्या उठावाचे सूत्रधार तात्या टोपे होते. त्यांनी या ठिकाणच्या स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र करुन इंग्रजी सैन्याच्या विरोधात रणशिंग फुंकले. ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंचा पराभव झाला, तर दुसरीकडे नानासाहेब पेशव्यांचा अज्ञातवास, अशा कठीण काळात ब्रिटीशांसोबत तात्या टोपे हा एकटा मराठी वाघ लढत होता.
सरदार मानसिंगाच्या फितुरीने केला घात :नानासाहेब पेशव्यांनी वाराणसी, कानपूर, अलाहाबाद या ठिकाणी दौरे काढले, यात तात्या टोपेंनी महत्वाची भूमीका बजावली. जनरल हॅवलॉकने जून 1857 ला कानपूरला वेढा दिला. यावेळी तात्या, ज्वालाप्रसाद यांचा 16 जुलै 1857 ला पराभव झाला. त्यामुळे तात्यांनी विठूरला मुक्काम ठोकून पुन्हा कानपूरवर हल्ला करण्याची योजना आखली. मात्र 16 ऑगस्ट 1857 ला हॅवलॉक विठूरवर चालून आला. यावेळी तात्यांचा पराभव झाल्याने त्यांनी शिंदेंचे सैन्य आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले. 22 मार्च 1857 ला इंग्रजांनी झासीला वेढा दिला. यावेळी झासीची राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला. ह्यू रोझ या इंग्रज अधिकाऱ्याचा पराभव करुन तात्याने ग्वाल्हेर काबीज केले. मात्र इंग्रजांनी त्यांचा वर्षभर पाठलाग केला. यात 13 जानेवारी 1859 ला तात्यांनी फिरोजशाहांची भेट घेतली. फिरोजशाह आणि तात्या देवासला थांबले असताना इंग्रजांनी छापा मारला, मात्र फिरोजशाहाने तात्यांना सोडले. त्यानंतर तात्यांनी शिंद्यांकडे आसरा घेण्यासाठी धाव घेतली. मात्र शिंदेचे सरदार मानसिंग हा इंग्रजांना फितूर झाल्याने 7 एप्रिल 1859 ला इंग्रज सैन्याने तात्या टोपे यांना पकडले. त्यानंतर इंग्रज सैन्याने 18 एप्रिल 1859 ला तात्यांना फाशी दिली. तात्या टोपेंच्या बलिदानाने 1857 च्या उठावाचा लढाही संपला. तात्या टोपे या स्वातंत्र्य सेनानीचा आज बलिदान दिवस, त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतकडून मानाचा मुजरा.
हेही वाचा - World Art Day 2023 : काय आहे जागतिक कला दिनाचा इतिहास, कोण होते लिओनार्दो दा विंची, जाणून घ्या सविस्तर