हैदराबाद :पूर्वीच्या काळी विषकन्या असायच्या. त्यांचा वापर विरोधी राजे महाराजांना संपवण्यासाठी होत असे. त्या काळात सापांच्या विषाची नशाही केली जायची असे काही उल्लेख आपल्याला पुराणकथांमध्ये वाचायला मिळतात. विरोधी राजांना संपवण्यासाठी या विषकन्यांची भुरळ पाडण्यात येत असे. त्यानंतर या विषकन्यांचा संग या राजांनी केल्यावर त्यांचा मृत्यू होत असे, अशा प्रकारच्या या कथा आहेत. आता आधुनिक काळातहेरॉईन, कोकेन, चित्ता, MDMA, मॉर्फिनच्या नशेत युवा पिढीतील काही तरुण बरबाद होत असल्याचं तुम्ही वाचलं असेल. कदाचित ते तुम्ही लोकांनी पाहिलंही असेल. पण आता पुराणकाळातील सापाच्या विषाच्या नशेचा प्रकार पुन्हा फणा काढताना दिसतंय. देशात सापाच्या विषाची नशा करण्याचा एक मार्ग नव्यानं फोफावत आहे, ज्याला 'स्नेक व्हेनम' नशा म्हणतात. सापाच्या विषाचं व्यसन हा चर्चेचा विषय बनला आहे. कारण एल्विश यादव या प्रख्यात यूट्युबरवर यासंदर्भात आरोप झालाय. पाहूया ही नशा किंवा व्यसन आहे तरी काय?
'स्नेक व्हेनम' हजारो वर्षांपासून वापरलं जात आहे : जगभरात एक लाखाहून अधिक प्राण्यांचं विष सापडतं. प्राण्यांचं विष हे एंजाइमॅटिक आणि नॉन-एंझाइमॅटिक यौगिकांचं जटिल मिश्रण असतं. हे विष साप, मासे, कीटक आणि कोळी, स्टारफिश तसंच समुद्री अर्चिन, जेलीफिश आणि कोरल यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून मिळतं. प्राण्यांच्या विष ग्रंथीतून विष बाहेर पडतात. पारंपारिक औषधांमध्ये हजारो वर्षांपासून सापाचं विष वापरलं जात आहे. हजारो वर्षांपूर्वी चेचक आणि कुष्ठरोगावर उपचार करण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी प्राण्यांच्या विषाचा वापर केला जात असे. यामध्ये सापाच्या विषाचाही समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात थेरियाक नावाचा पदार्थ आयुर्वेद तज्ञांनी तयार केला होता, जो सापाच्या विषाचं मिश्रण होता. याचा वापर 18 व्या शतकापर्यंत चालू राहिला. यानंतर अल्बर्ट कॅल्मेट नावाच्या तज्ज्ञानं प्राण्यांमध्ये विषाचा छोटा डोस देऊन अँटीव्हेनम तयार करण्याची पद्धत शोधून काढली.