हैदराबाद -जमिनीवर बसून जेवणे ही भारतीयांची जुनी परंपरा आहे. अजूनही भारतात अनेक प्रांतात अशा पद्धतीने अन्न ग्रहण करतात. तुम्ही ऐकले असेल तुमचे आजी-आजोबा तुम्हाला जमिनीवर बसून शांत मनाने जेवण करा, असे सांगायचे. त्याने शरीराला पोषक आहार मिळतो, असे ते म्हणायचे. डॉक्टरांचाही यावर विश्वास आहे. मात्र, आधुनिकतेमुळे लोक परंपरा मानत नाहीत आणि पाळतही नाहीत. इंदौरच्या एमजीएम मेडिकल कॉलेज आणि नेहरू चिल्ड्रन्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील न्यूट्रिशनिस्ट डॉ. संगीता मालू यांच्या म्हणण्यानुसार आपण काय खातो, कसे खातो आणि त्यावेळी आपली मन:स्थिती कशी आहे, याचा परिणाम पचन क्रियेवर होत असतो. पण फक्त त्यावरच नाही तर पूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.
तुम्ही उभे राहून जेवलात तर पचन क्रियेत येतो अडथळा -
उभे राहण्यापेक्षा बसणे कधीही आरामदायी असते. आपले शरीर आणि मन शांत राहते. म्हणूनच बसून खाल्ले तर अन्नपदार्थ तुमच्या सर्व पचनक्रियेतून जाते. यामुळे पचन चांगले होते. आणि पचन यंत्रणेवर जास्त जोरही येत नाही, असे डॉ. संगीता मालू सांगतात. दुसरीकडे, जर आपण उभे राहून अन्न खाल्ले तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे अन्न शरीरात सर्व पाचन अवयवांमधून वेगाने जाते. अशा परिस्थितीत एकतर अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही किंवा यामुळे आपल्या पचन यंत्रणेवरचा भार वाढतो. आपले शरीर आवश्यक पोषक घटकांपासून वंचित राहते. यामुळे परिणामी काही रोग देखील उद्भवू शकतात.
खाताना बसण्याचा योग्य मार्ग -
आजकाल बहुतेक लोक जेवणाच्या टेबलाजवळ बसून खाणे पसंत करतात. जे उभे राहून खाण्यापेक्षा चांगले आहे. परंतु अन्नाचे योग्य वेळी पचन व्हावे आणि आपण जे काही खातोय त्यापासून पोषक द्रव्य मिळवण्यासाठी सुखासनात किंवा पद्मासनात बसणे चांगले. या स्थितीत बसल्याने आपल्या पचन प्रक्रियेवर गुरुत्वाकर्षणाचाही प्रभाव पडत नाही, असे डॉ. संगीता सांगतात.
जमिनीवर बसून अन्न ग्रहण करणे का आहे चांगले -
तुमचे हृदय निरोगी राहते -
जमिनीवर बसून अन्नपदार्थांचे सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्तप्रवाह चांगला खेळतो आणि हृदय चांगले काम करते.