लॉस एंजेलिस (यूएसए) : कोरोनाचे विषाणू आपला संसर्ग वाढविण्यासाठी असंसर्गीत पेशींमधील प्रथिनांचे अपहरण करून जास्तीत जास्त पेशींमध्ये आपले संक्रमण वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांना अभ्यासादरम्यान आढळून आले आहे. त्याचबरोबर, कोरोनाचे संक्रमण रोखू शकणारी औषधे देखील शोधली गेली आहेत.
युरोपियन बायोइन्फॉर्मेटिक्स इन्स्टिट्यूट (ईएमबीएल-ईबीआय) आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को (यूसीएसएफ) विद्यापीठामधील संशोधकांनी नमूद केले आहे की, कोरोना विषाणू सार्स-कोव्ह-२ हा यजमान पेशींमधील यंत्रणा नियंत्रणात घेऊन नवीन विषाणू तयार करण्यासाठी त्यामध्ये फेरफार करतात. तसेच ज्या प्रथिनांचे कोरोना विषाणूंकडून अपहरण केले जाते ती प्रथिने आणि यजमान पेशीतील आणि एन्झाईम (उत्प्रेरक) सारख्या इतर महत्त्वपूर्ण रेणूंच्या क्रियाविधीमध्ये व्यत्यय आणला जातो. परिणामी त्यांच्या रासायनिक संरचनेत देखील बदल होतात.
रविवारी 'जर्नल सेल'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी सर्व यजमान पेशी आणि व्हायरल प्रथिनांचे विश्लेषण केले असून सार्स-कोव्ह=-२ चा संसर्ग झाल्यानंतर फॉस्फोरिलेशन नावाच्या एंझायमॅटिक प्रक्रियेमध्ये बदल झाल्याचे आढळून आले. फॉस्फोरिलेशन प्रक्रियेदरम्यान किनासे नावाच्या एन्झाईम प्रोटीनमध्ये 'फॉस्फोरिल ग्रुप' चा नव्याने समावेश होतो. हा ग्रुप पेशी- पेशींमधील संप्रेषण, पेशींच्या वाढीसह अनेक पेशी प्रक्रियेच्या नियमनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो असे संशोधकांनी म्हटले आहे.
संशोधकांच्या मते, होस्ट प्रोटीनमध्ये फॉस्फोरिलेशन प्रक्रियेच्या माध्यमातून बदल केल्यानंतर विषाणू इतर पेशींमध्ये आपले संक्रमण फैलावतो आणि नवनवीन पेशींना देखील नियंत्रणात घेण्यात उत्तेजन देऊ शकतो.
संशोधकांच्या अभ्यासादरम्यान आढळून आले की, विषाणूच्या संपर्कात आलेल्या एकूण प्रोटिन्सपैकी १२ टक्के प्रोटिन्समध्ये बदल घडून आले. तसेच ज्या संभाव्य किनासे एन्झाईममध्ये हे नियमन होण्याची शक्यता असते तेच एन्झाईम विषाणूची क्रिया थांबविण्यासाठी आणि कोविड-१९ ला आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे संभाव्य लक्ष्य आहेत.