हैदराबाद - एकीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगात भीतीदायक वातावरण निर्माण केलेले असताना, ह्युस्टन विद्यापीठातील संशोधकांनी असे एक एअर फिल्टर विकसित केले आहे जे कोविड-१९ आजारास कारणीभूत विषाणूस ताबडतोब नष्ट करते.
विषाणूला पकडून ताबडतोब नष्ट करणाऱ्या फिल्टरची रचना झिफेंग रेन यांनी केली आहे. रेन हे विद्यापाठीतील टेक्सास सेंटर फॉर सुपरकंडक्टिव्हिटी येथे संचालक आहेत. यासाठी त्यांनी ह्युस्टन येथील वैद्यकीय स्थावर मालमत्ता विकास कंपनी मेडिस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोंझेर होरानी आणि इतर संशोधकांचे सहकार्य घेतले आहे. गॅल्वेस्टोन राष्ट्रीय प्रयोगशाळेत याबाबत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत संशोधकांना असे आढळून आले की, या फिल्टरमध्ये प्रवेश केल्यानंतर कोविड-१९ आजार होण्यास कारणीभूत असलेला विषाणू 99.8 टक्के प्रमाणात पहिल्याच फेरीत नष्ट झाला. व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध असलेला निकेल फोम 392 अंश फॅरनहाईट एवढ्या तापमानावर गरम करुन या फिल्टरची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना झिफेंग रेन म्हणाले, की हे फिल्टर विमानतळे आणि विमाने, कार्यालयीन इमारती, शाळा तसेच जहाजांमध्ये कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त ठरु शकते."
"याची विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्याची क्षमता आपल्या समाजासाठी उपयोगी ठरु शकते. मेडीस्टारचे अधिकारी डेस्कटॉप प्रारुपाचा प्रस्ताव मांडणार आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या आजूबाजूची हवा शुद्ध करण्याची क्षमता असेल", असेही ते म्हणाले. संपुर्ण अमेरिकेत महामारीचा प्रसार होत होता, तेव्हा विषाणूला पकडणाऱ्या एअर फिल्टरची विकसित करण्याकरिता मदत करावी म्हणून मेडिस्टारने 31 मार्च रोजी ह्युस्टन विद्यापिठातील टेक्सास सेंटर फॉर सुपरकंडक्टिव्हिटीकडे प्रस्ताव मांडला, असेही रेन यांनी सांगितले. हा विषाणू हवेत सुमारे 3 तास टिकतो, हे संशोधकांना ठाऊक होते. अशावेळी, तो त्वरित नष्ट करण्यासाठी फिल्टर तयार करण्याची योजना व्यवहार्य होती. उद्योग पुन्हा सुरु होत असताना, वातानुकुलित परिसरांमध्ये प्रसार नियंत्रित करणे निकडीचे होते.
त्याचप्रमाणे, 20 अंश सेंटीग्रेडपेक्षा अधिक तापमानात हा विषाणू टिकू शकत नाही, हेही मेडिस्टारला माहीत होते. म्हणून, संशोधकांनी तप्त फिल्टर वापरण्याचा निर्णय घेतला.