लिड्स :नियमितपणे प्रथिनांच्या सेवनासह एक कप चहा किवा कॉफी पिल्याने महिलांमध्ये हिप फ्रॅक्चरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. हे संशोधन लिड्स येथील विद्यापीठाच्या फूड सायन्स विभागातील संशोधकांनी केले आहे. या संशोधनानुसार महिलांच्या प्रथिनांमध्ये एक कप चहा किवा कॉफीमुळे दररोज 25 ग्रॅम वाढ होते. तर त्यांच्या हिप फ्रॅक्चरच्या धोक्यामध्ये सरासरी 14 टक्के घट होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. अतिरिक्त चहाचा किवा कॉफीचा एक कप हिप फ्रॅक्चरचा धोका 4 टक्के कमी करत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
अशा महिलांना हिप फ्रॅक्चरचा धोका होतो कमी :कमी वजन असलेल्या महिलांच्या संरक्षणात्मक फायदे जास्त असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. दररोज प्रथिने २५ ग्रॅमने वाढल्याने अशा महिलांना हिप फ्रॅक्चरचा धोका ४५ टक्के कमी होत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. प्रथिने कोणत्याही स्वरूपात घेता येऊ शकतात. यात मांस, दुग्धजन्य पदार्थ किंवा अंडी आणि शेंगदाणे, शेंगा यातूनही प्रथिने मिळू शकत असल्याचे या संशोधकांनी नमूद केले आहे. शुद्ध शाकाहारी महिलांसाठी ही प्रथिनांचे अनेक स्त्रोत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. आहारातील तीन ते चार अंडी सुमारे 25 ग्रॅम प्रथिने देतात. 100 ग्रॅम टोफू सुमारे 17 ग्रॅम प्रथिने प्रदान करेल असेही या संशोधकांचे मत आहे. या संशोधकांनी केलेल्या अभ्यास गटातील फक्त 3 टक्के पेक्षा जास्त स्त्रियांना हिप फ्रॅक्चरचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे.
काय आहे संशोधन : या संशोधकांनी २६ हजार पेक्षाही जास्त मध्यम वयीन महिलांचा अभ्यास केला आहे. या संशोधनात महिलांच्या आहार आणि आरोग्यातील घटकांचा संबंध ओळखला गेला. मात्र त्याचे थेट परिणाम पुढे आले नसल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. ज्या महिलांनी नियमितपणे प्रथिनांच्या सेवनासह एक कप चहा किवा कॉफीचे सेवन केले आहे, अशा महिलांमध्ये हिप फ्रॅक्चरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.