हैदराबाद Relationship Tips : सासू सूनेचं नातं म्हणजे 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं म्हणायला हरकत नाही. खरचं हे नातं इतर नात्यांपेक्षा वेगळं असतं. या नात्याची मजेशीर गोष्ट म्हणजे सासू सूनांमध्ये घडीभर प्रेम, माया असते तर पुढच्या घडीला कोणत्याही कारणांनी वाद होतात. प्रत्येक मुलीचं नक्कीच हे स्वप्न असतं की, तिला चांगली सासू मिळावी. जुन्या काळातील सासू सुनेच्या नात्यात आणि आजकालच्या सासू सुनेच्या नात्यात चांगलाच बदल दिसून येतो. सध्याच्या सासू-सुनांमध्ये प्रेम, मैत्री आणि जिव्हाळा दिसून येतो. सासू सुनेच्या नात्यात गोडवा आला की या नात्याचं मैत्रीत रुपांतर होतं. हे मैत्रीचं नातं टिकवून ठेवायचं असलं तर काय करावं हे जाणून घ्या.
कधीही सासूला सांगू नका 'या' गोष्टी
नवऱ्यासोबतचे वाद : नवरा बायकोमधलं भांडण तसं तर कधीच कोणाला सांगू नये. त्यातल्या त्यात सासूचं आणि तुमचं मैत्रीचं नात असेल तर कधीही सासूला नवऱ्या सोबतचे वाद सांगू नका. कारण तुमची सासू असण्यासोबत ती तुमच्या नवऱ्याची आई देखील आहे, हे विसरून चालणार नाही. कोणतीच आई आपल्या मुलाविषयी चुकीचं काही ऐकून घेत नाही. त्यामुळं अशावेळी सासू सुनेच्या नात्यात गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त असते.