महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Proper Care For Healthy Hair : सुंदर आणि लांब केसांसाठी अशी घ्या आरोग्याची काळजी; दिसाल सुकेशनी - शॅम्पूचा अती वापर केसांना हानी पोहोचवतो

केसांची निगा राखण्यासाठी बाजारात अनेक शॅम्पू उपलब्ध आहेत. त्यासह केस सुंदर आणि मजबूत दिसण्यासाठी स्त्रिया हेअर कलर करुन विविध उपायही करतात. मात्र शॅम्पूचा अती वापर केसांना हानी पोहोचवतो. त्यामुळे केस पातळ होऊन गळू लागतात. यासाठी नवी दिल्लीतील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ विपीन सचदेवा यांनी दिलेल्या टिप्स खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

Proper Care For Healthy Hair
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 1, 2023, 10:52 AM IST

हैदराबाद : सुंदर आणि लांब मजबूत केस असावे अशी कोणत्याही स्त्रीची इच्छा असते. मात्र केसांची उत्तम निगा राखल्यानंतरच तुमचे केस लांब, मजबूत आणि घनदाट होतात. त्यातही डोके निरोगी असेल तरच केस लांब आणि मजबूत असतात अशी माहिती तज्ज्ञ व्यक्त करतात. कोरडी टाळू असलेल्या स्त्रियांना केसांशी निगडीत अनेक समस्या निर्माण होतात अशी माहिती नवी दिल्लीतील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ विपिन सचदेव यांनी दिली आहे. तर मग जाणून घ्या केसांचे आरोग्य कसे राखावे याबाबतची त्वचाविकार तज्ज्ञ डॉ विपिन सचदेव यांनी खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी दिलेली ही माहिती.

सुंदर केसांसाठी योग्य आहारासोबतच काळजी घेणे महत्वाचे :केस नेहमीच सुंदर आणि मजबूत दिसण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करतात. यात स्त्रियांसह पुरुषांनाही त्यांचे केस दाट आणि चांगले असावे म्हणून प्रयत्न करतात. यात काही स्त्रियांना तर आपल्या केसांची खूपच काळजी असते. मात्र कधी कधी केसांना अधिक आकर्षक दिसण्याची इच्छा देखील हानीकारक ठरु शकते. केसांची काळजी घेण्याच्या किंवा सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी अधिकाधिक केमिकलयुक्त उत्पादने वापरल्याने केसांची हानी होते. केसांचीच नव्हे तर त्वचेचीही काळजी न घेणे यामुळेही नुकसान होऊ शकते. डोक्याला अनेक वेळा आजार झाल्याने केस कमकुवत आणि निर्जीव होऊ लागतात अशी माहिती डॉ विपिन सचदेव यांनी दिली आहे.

केसांचा तेलकटपणा व टाळू कोरडी असल्याने नुकसान :अनेक जणांना केसांच्या अनेक आजारांनी ग्रासल्याचे वारंवार दिसून येते. यात केस गळती होणे, अकाली केस पांडरे होणे, केसाला तेलकटपणा येणे आदी आजारांचा यात समावेश आहे. मात्र केसांचा तेलकटपणा आणि टाळू कोरडी झाल्याने केसांचे नुकसान होत असल्याचे डॉ विपीन सचदेवा यांनी यावेळी सांगितले. शरीरात पोषण आणि पाण्याची कमतरता झाल्यासही केसांचे नुकसान होते. केसांमध्ये किंवा टाळूवर कोणत्याही प्रकारचा आजार किंवा संसर्ग झाल्यासही केसांची हानी होते. त्यासह हवामानाचा प्रभावामुळे जास्त प्रदूषण झाल्यासही केसांना हानी होते. सूर्याच्या हानिकारक किरणांच्या प्रभावामुळेही केसाला धोका असल्याची माहिती डॉ विपीन सचदेवा यांनी दिली. केसांची योग्य साफसफाई आणि काळजी न घेतल्याने केस खराब होतात. केसांमध्ये केमिकलयुक्त उत्पादनांचा अतिरेक वापर केल्यानेही केसांना हानी पोहोचत असल्याची माहिती विपीन सचदेवा यांनी यावेळी दिली.

केमीकलयुक्त शॅम्पूमुळे जळतो केसांचा वरचा थर :सध्या बाजारात केसांच्या स्वच्छतेसाठी अनेक शॅम्पू उपलब्ध आहेत. मात्र या केमीकलयुक्त शॅम्पूच्या वापराने केसांच्या वरचा थर जळत असल्याचे डॉ विपीन सचदेवा यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासह कंडीशनर, हेअर कलर, जेल आदींच्या वापरामुळेही केसांचा वरचा थर जळत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे केस पातळ होऊ लागतात. त्यानंतर केस कमकुवत होऊन गळू लागतात. त्याचवेळी हे शॅम्पू आणि हेअर कलर डोक्याच्या त्वचेवरील म्हणजेच टाळूवर देखील परिणाम करतात. कधीकधी यामुळे कोरडी टाळू होऊ लागते. त्यावर संसर्गही होऊ लागतो, असेही डॉ विपीन सचदेवा यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरडी टाळू बहुतेक वेळा केसांची योग्य काळजी न घेतल्याने होते. एक्जिमा, सेबोरेरिक त्वचारोग, टाळू, एटोपिक डर्माटायटिस, टिनिया कॅपिटिस आणि सूर्यप्रकाशामुळे होणारे ऍक्टिनिक केराटोसिस आदी संसर्गामुळेही केस खराब होण्याची शक्यता आहे. शरीरातील पोषण आणि पाण्याची कमतरता, डोक्याची योग्य स्वच्छता न होणे आदी कारणामुळेही केसाला हानी पोहोचते. सीबमचे नैसर्गिक तेल आहे. हे तेल टाळूमधील ओलावा नियंत्रित करते. त्यात ट्रायग्लिसराइड्स, फॅटी ऍसिडस्, वॅक्स एस्टर आणि स्कॅव्हेनस, कोलेस्टेरिल एस्टर आणि कोलेस्टेरॉल असतात.

केसांची घ्या योग्य काळजी :

  • केस आणि त्वचा दोन्ही निरोगी आणि सुंदर राहण्यासाठी योग्य, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक ऋतूमध्ये आवश्यक प्रमाणात पाण्याचे सेवन करणे सर्वात महत्वाचे आहे. शरीर निरोगी असेल तर आरोग्याशी संबंधित समस्या होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय केसांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही डॉ विपीन सचदेवा यांनी सांगितले आहे.
  • केस निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी
  • फळे, भाज्या, कडधान्ये, धान्ये यांचा आहारात आवश्‍यक प्रमाणात समावेश करावा. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळू शकेल. शरीरावर विपरीत परिणाम करणारे अन्न टाळावे.
  • ऋतूनुसार फळांचा रस, दही, ताक, लस्सी आणि नारळाच्या पाण्याशिवाय आहारात पाण्याचा समावेश करावा, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यासोबतच शरीराला पोषणही मिळते.
  • केस वातावरणानुसार नियमित अंतराने धुवावेत. जास्त प्रदुषीत ठीकाण, उष्णता यामुळे जास्त घाम येण्याची शक्यता असते. त्यामुळे डोक्यात घाण जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हर्बल शॅम्पू वापरावा. कमी अंतराने डोके धुवू शकता.
  • जे लोक जास्त वेळ हेल्मेट घालतात त्यांनी घामामुळे केसांच्या मुळांमध्ये घाण जमा होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
  • केसांमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल युक्त उत्पादन वापरण्यापूर्वी त्यामध्ये किती केमिकल असते हे जाणून घ्या. त्या उत्पादनाच्या वापराशी संबंधित सर्व आवश्यक खबरदारी जाणून, त्यांचे पालन करा.
  • आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे टाळूतील रक्ताभिसरण चांगले होईल. केसांना आवश्यक ओलावाही मिळू शकेल.
  • शक्यतो केस नैसर्गिकरित्या कोरडे करा. केस सुकवण्यासाठी किंवा केसांच्या स्टाईलसाठी हेअर ड्रायरचा जास्त वापर केल्याने देखील टाळूचे नुकसान होऊ शकते.
  • खूप गरम पाण्याने केस कधीही धुवू नका. यासाठी नेहमी कोमट किंवा थंड पाणी वापरा. खूप गरम पाण्याचा वापर केल्याने केसांची आर्द्रता कमी होते, त्यासह टाळूलाही धोका होतो.
  • केस धुताना नेहमी शॅम्पू लावा आणि बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे केसांच्या मुळांमध्ये लपलेली घाण साफ होईल.

संसर्गामुळे होऊ शकतात केस पातळ आणि निर्जीव :काही स्त्रिया केसांची सगळी निगा राखूनही त्यांचे केस तुटतात. तर काहींचे केस पातळ आणि निर्जीव होतात. काही स्त्रियांच्या त्वचेची जळजल होते, त्वचा लाल होते, कोरडेपणा येतो, त्यामुळे अशा स्त्रियांनी दुर्लक्ष न करता, तातडीने त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ विपीन सचदेवा यांनी केले आहे.

हेही वाचा - Problems During Menstruation : मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाकडे करू नका दुर्लक्ष, नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम

ABOUT THE AUTHOR

...view details