महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

कोरोना आहेच; पण म्हणून मलेरियाकडे दुर्लक्ष नको! - मलेरिया उपचार

पावसाळा सुरू होताच साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोकाही समोर येतो. त्यातच सध्या कोरोना विषाणूची साथ असल्यामुळे आपल्याला जराही आजारी पडून चालणार नाही. त्यामुळेच, पावसाळ्यात नेहमी तोंड वर काढणारा साथीचा आजार- मलेरियाला आपण कशा प्रकारे आळा घालू शकतो, पाहूयात…

Prepare to prevent yourself from malaria etv bharat article
कोरोना आहेच; पण म्हणून मलेरियाकडे दुर्लक्ष नको!

By

Published : Jun 23, 2020, 4:06 PM IST

Updated : Jun 23, 2020, 4:28 PM IST

हैदराबाद : पावसाळा सुरू होताच साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोकाही समोर येतो. त्यातच सध्या कोरोना विषाणूची साथ असल्यामुळे आपल्याला जराही आजारी पडून चालणार नाही. त्यामुळेच, पावसाळ्यात नेहमी तोंड वर काढणारा साथीचा आजार- मलेरियाला आपण कशा प्रकारे आळा घालू शकतो, पाहूयात…

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. मादी अ‌ॅनोफेलीस या जातीच्या डासांमुळे हा रोग प्रसार पावतो. याच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजणे याचा समावेश होतो. मलेरियाचा प्रसार तेव्हा सर्वाधिक होतो, जेव्हा डासांच्या पैदाशीसाठी अनुकूल वातावरण असते. त्यामुळेच, पावसाळ्यापूर्वीच मलेरियाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत.

डासांची पैदास थांबवण्यासाठी सर्वप्रथम, पाणी साठवण्याचा सर्व वस्तू - जसेकी माठ, जार, पिंप, पाण्याची टाकी इ. गोष्टींची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. थांबलेल्या पाण्यामध्ये - विशेषतः डबक्यांमध्ये डासांची पैदास अधिक होते. त्यामुळे, पावसानंतर ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणांचा बंदोबस्त पावसाळ्यापूर्वीच करावा. जेणेकरून, अशा ठिकाणी पाणी साचणार नाही, आणि पर्यायाने डासांच्या पैदाशीलाही आळा बसेल.

देशामध्ये मलेरियाच्या प्रसाराला आळा घालण्यास आपल्याला बरेच यश मिळाले आहे. मलेरियाचे एकूण रुग्ण आणि मृत्यूदर याची आकडेवारी पाहता हे सहज कळून येते. उदाहरणदाखल सांगायचे झाल्यास, २०१६मध्ये देशात मलेरियामुळे ३३१ लोकांचा बळी गेला होता. तर, २०१९मध्ये ही संख्या ५०वर आलेली पहायला मिळाली.

मलेरिया निर्मूलनासाठीची राष्ट्रीय चौकट (एनएफएमई)

  • ११ फेब्रुवारी २०१६ला आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून एनएफएमईची स्थापना करण्यात आली.
  • २०२७पर्यंत देशाला मलेरियामुक्त करण्याच्या निर्धाराने याची स्थापना करण्यात आली. यामध्ये त्यासाठीच्या उपाययोजनाही दिल्या गेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि एशिया-पॅसिफिक लीडर्स मलेरिया अलाईन्स (एपीएलएमए) यांनी संयुक्तपणे २०३०पर्यंत मलेरिया समूळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • एनएफएमईने एक राष्ट्रीय सामरिक योजना तयार केली आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. यादरम्यान, मलेरियाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर विविध योजना तयार करून त्या राबवण्यात येणार आहेत.

स्वतःच करा स्वतःचा बचाव..

  • डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणीसारख्या वस्तूंचा वापर करा.
  • हाता-पायांना पूर्णपणे झाकतील असे कपडे घाला.
  • संध्याकाळच्या वेळी दारे-खिडक्या लाऊन घ्या.
  • डासांना दूर ठेवण्यासाठी जे उपाय उपलब्ध आहेत (कॉईल, लिक्विड मशीन, मॉस्किटो रिपेलेंट क्रीम इ.), त्यांचा शक्य तेवढा वापर करा.
  • मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या भागामध्ये जाणे टाळा.
  • लहान मुलांना डास चावणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.
  • मलेरियाचे एकही लक्षण आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
Last Updated : Jun 23, 2020, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details