हैदराबाद -दर वर्षी अनेक कारणांमुळे मानसिक आजारांमध्ये वाढ होत असते. पण मानसिक आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम करणारा एकमेव रोग म्हणजे कोविड १९. सुरुवातीला या आजाराचा आपल्याला संसर्ग होईल या भीतीपासून ते बेरोजगारी, आर्थिक संकट, भविष्याची अनिश्चितता सगळ्यालाच लोकांनी तोंड दिले. या साथीच्या रोगामुळे जगभर नैराश्य, अस्वस्थता आणि तणाव याचा अनुभव लोकांनी घेतला. त्याच वेळी ज्यांना पार्किन्सन, अल्झायमर, डायमेनशिया हे मज्जसंस्थेचे आजार आहेत, त्यांना लाॅकडाऊनमुळे योग्य औषधे न मिळाल्याने अतिशय त्रास सहन करावा लागला. याशिवाय वैवाहिक कलह आणि घरगुती हिंसाचाराची प्रकरणही नोंदवण्यात आली आणि लोक मानसशास्त्रज्ञांकडे मदतीसाठी गेले. या वर्षी मानसिक आजाराचा गंभीर परिणाम लोकांवर झाला.
ताण आणि औदासिन्यात वाढ -
कोविड १९ चा उद्रेक सुरू झाला, रुग्ण वाढले आणि देशांनी लाॅकडाऊन घोषित केले. त्यामुळे लोकांना आरोग्य आणि आर्थिक समस्या भेडसावायला लागल्या. शिवाय लाॅकडाऊनमुळे घराबाहेर पडण्याची कोणाला परवानगी नव्हती. त्यामुळे लोकांना वाटले की ते जणू तुरुंगातच अडकले आहेत आणि त्याने नैराश्यात झपाट्याने वाढ झाली.
विषाणूची लागण झालेल्यांमध्ये नैराश्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात दिसून आले. भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, कोविड १९ मधील जवळपास ३० % रुग्णांना नैराश्य आणि चिंता यांनी ग्रासले होते. शिवाय घरी लोकांना एकमेकांसोबत राहणे भाग पडले. त्यांच्या मध्ये असलेल्या असंतोषामुळे घरगुती हिंसाचार वाढला आणि कौटुंबिक कलह निर्माण झाला. यामुळेही लोकांमध्ये तणाव आणि नैराश्य जास्त वाढले.
आश्चर्य म्हणजे केवळ प्रौढच नव्हे तर मुलेही चिंता आणि नैराश्याचे बळी ठरले. शाळा व महाविद्यालये बंद करणे, ऑनलाईन वर्ग, २४ तास घरी रहाण्याची सक्ती यामुळे चिंता, अस्वस्थता, दबाव वाढणे, नैराश्य इत्यादी स्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती इतकी गंभीर होती की बर्याच राज्य सरकारने पुढाकार घेऊन मुलांसाठी ऑनलाईन समुपदेशन सत्र सुरू केले.
आत्महत्यांमध्ये वाढ -
आकडेवारीनुसार जगभरातले जवळ जवळ ८ लाख लोक आणि आपल्या देशातले जवळ जवळ २ – ३ लाख दर वर्षी आत्महत्या करतात. पण २०२० मध्ये आत्महत्त्येचे प्रमाण दुप्पट झाले. यामागचे कारण म्हणजे नैराश्य, निराशा आणि अनिश्चितता. या आत्महत्यांमध्ये काही लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही स्टार्सही होते. सर्व वयोगटातील लोकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यातले गांभीर्य लक्षात घेता राज्य आणि देश पातळीवरचे अनेक मानसोपचार तज्ज्ञ एकत्र आले. आणि लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन समुपदेशन सुरू केले.