हैदराबाद :पापमोचनी एकादशी ही पापांचा समूळ नाश करणारी एकादशी आहे. त्यामुळे सगळ्याच राज्यात पापमोचनी एकादशीचे व्रत मोठ्या भक्तीभावाने करण्यात येते. यावेळी पापमोचनी एकादशीच्या दिवशी चार महत्त्वाचे योग येत आहेत. द्विपुष्कर योग आणि सर्वार्थसिद्धी योग दिवसभर प्रभावी ठरतील. ही एकादशी साक्षात सर्व संकटे, अडथळ्यांचा नाश करणारी आहे. आजचा शुभ दिवस म्हणजे भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या उपासनेचा विशेष दिवस आहे. या शुभ दिवशी स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करून गळ्यात पिवळ्या रंगाचा धागा बांधून पूजा करण्याचा नियम आहे.
दुपारी झोपण्यास आहे मनाई : पापमोचन एकादशीच्या दिवशी दुपारी झोपण्यास मनाई असल्याचे ज्योतिषी पंडित विनीत शर्मा यांनी सांगितले. या दिवशी मंत्रोच्चार, पूजा आणि ध्यान करणे आवश्यक आहे. या शुभ दिवशी श्री हरी विष्णूची पूजा केली जाते. माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूला पिवळ्या कपड्यांमध्ये आसन दिले जाते. त्यानंतर भगवान विष्णूंना शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. भगवान विष्णूंना गंगा, नर्मदा, गोदावरी, यमुना, सरस्वती आदी नद्यांच्या शुद्ध पाण्याने अभिषेक केला जात असल्याचेही पंडीत शर्मा यांनी स्पष्ट केले.
पूजेत वापरा पिवळा रंग : पापमोचनी एकादशीला पिवळ्या फुलांनी भगवान विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मी नारायणाची चंदन, कुंकू, गुलाल, गोपी चंदन, अष्ट चंदन, आदीने विधिवत पूजा करावी. ही उपासना पूर्ण भक्तिभावाने करावी. या उपासनेत स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. स्नान करताना शरीराच्या सर्व अवयवांची शुद्धी करणे आवश्यक आहे. या शुभ दिवशी नवीन जनेयू धारण करुन एकादशी साजरी केली जाते. या शुभ दिवशी नवीन कपडे घेतले जात असल्याचेही यावेळी पंडीत शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.