कोरोना विषाणू जलद पसरत असल्याने देशभरात लॉकडाऊन लादला गेला. या काळात आपल्याला आराम करायला मिळाला. आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता आला. पण काही आव्हानेही समोर आली. १४ वर्षांचा स्वयम शर्मा हा नववीचा विद्यार्थी आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने आपला बराच वेळ टीव्ही पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे, स्नॅक्स खाणे आणि नेहमीपेक्षा जास्त झोपणे यात घालवला. याचा परिणाम हळू हळू त्याचे वजन वाढले. सुरुवातीला त्याच्या पालकांना ते सर्वसामान्य वाटले. पण स्वयंम थोडे काम करूनही दमायला लागला, त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, तेव्हा मात्र त्याच्या पालकांना काळजी वाटायला लागली. त्यानंतर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाबरोबरच त्याने आपली जीवनशैलीही बदलली. त्यामुळे आता त्याच्यात हळू हळू लक्षात येण्याजोग्या सुधारणा झाल्या आहेत.
या काळात फक्त स्वयमच्या बाबतीत ही समस्या निर्माण झाली नाही. तर तनिषा (१६), राघव (१६), कोयल (१३) आणि कौस्तुभ (१०) यांनाही या लठ्ठपणाला तोंड द्यावे लागले. फक्त प्रौढच नाहीत तर लहान मुलांमध्ये अति वजन वाढण्याची समस्या उद्भवते. त्याबद्दल आम्ही बालरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली नवले पुरंदरेंशी बोललो. त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या पुढीलप्रमाणे -
लठ्ठपणाशी संबंधित काही समस्या
चुकीच्या पद्धतीचे खाणे आणि जीवनशैली यामुळे कुठल्याही वयात लठ्ठपणा उद्भवू शकतो. कधी कधी काही अनुवांशिकता किंवा हार्मोनल समस्या किंवा काही आजार यामुळे लठ्ठपणा येतो. लहान मुलांच्या अतिरिक्त वाढत्या वजनामुळे त्यांना थकवा येतो. त्यांना झोप लागत नाही, तसेच तणावही वाढतो. याशिवाय लठ्ठपणामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो. वजन जास्त वाढले तर मग मधुमेह, हृदय रोग, रक्तदाब आणि झोप न लागणे या आरोग्याच्या समस्या पुढे येतात.
लठ्ठपणाची कारणे
- शिस्तबद्ध नित्यक्रमाचा अभाव
- अभ्यासासाठी एका जागी बराच काळ बसून राहणे
- भूक लागल्याने किंवा कधी ताणतणाव, कंटाळा आला म्हणून खाणे
- पौष्टिक आहारापेक्षा जंक फूड, तेलकट, तिखट आणि अति गोड पदार्थांचे सेवन