वॉशिंग्टन : आयुष्यात सुख समृद्धी मिळवण्यासाठी माणूस झटत असतो. त्यामुळे जीवन आनंदी आणि आरामात जगावे असेही सगळ्यांना वाटत असते. मात्र आयुष्यात आराम आणि आनंदाने नव्हे तर चिंता आणि रागातूनच यश मिळवता येते. राग आणि चिंतेतून यश मिळवता येत असले तरी त्या बदल्यात आरोग्याशी तडजोड करावी लागत असल्याचा दावा इसेक्स विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. याबाबतचे संशोधन पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
चिंता आणि राग देते यश मिळवण्यासाठी उर्जा :चिंता आणि रागीट व्यक्तीला सतत नकारात्मक विचाराचा म्हणून हिणवले जाते. मात्र चिंता आणि राग हे यश मिळवण्यासाठी उर्जा देत असल्याचा दावा इसेक्स विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. चिंता आणि राग हे आनंदासह आशेप्रमाणे ऊर्जा देणारे असल्याचे आढळल्याचा या संशोधकांनी दावा केला आहे. मात्र यासाठी धोरणात्मक विचारांच्या अभावासह खराब आरोग्याशी सामना करावा लागत असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. यात व्यक्तीला डोकेदुखी, मळमळ, पाठदुखीसह तणावामुळे निद्रानाशाच्या आजाराचाही सामना करावा लागत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
आशा ही सर्वात शक्तिशाली भावना :आशा ही सर्वात शक्तिशाली भावना आहे. त्यामुळे अभ्यासात सकारात्मक समज आणि भावनांवर नियंत्रण मिळवल्यास शिकण्याचा आनंद, यशाची इच्छा आणि यसाबद्दल अभिमान निर्माण होत असल्याचे या संशोधनात स्पष्ट करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांबाबतचे उदाहरण देण्यात आले. समान क्षमतेच्या दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर आशावादी विद्यार्थ्याने त्यांच्या नकारात्मक विचारांच्या मित्रापेक्षा एक ग्रेड जास्त मिळवला. याचा अर्थ कमी आशावादी व्यक्तीला नापास तर सकारात्मक विद्यार्थ्याला चांगले गुण मिळतील असेही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले.
चार देशातील विद्यार्थ्यांचा करण्यात आला अभ्यास :इसेक्स विद्यापीठातील सायकॉलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ रिनहार्ड पेकरुन यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडाच्या विद्यार्थ्यांचा अब्यास करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना डॉ डॉ रिनहार्ड पेकरुन यांनी हा यशस्वी भावनांसाठी 3D मॉडेल विकसित करणारा हा पहिला अभ्यास असल्याचा दावा केला आहे. हे मॉडेल पहिल्या दृष्टीक्षेपात अमूर्त वाटत असले तरी, ते यशाच्या भावना आपल्या जीवनातील गंभीरपणे महत्त्वाच्या भागांशी कशा प्रकारे संबंधित आहेत हे दाखवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोकरीच्या मुलाखती, चाचण्या आणि इतर तणावपूर्ण परिस्थितीत आपण कसे कार्य करतो हे आपण या संशोधनातून परिभाषित करू शकतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - ICMR On Flu : कोविडनंतर देशभरात वाढत आहेत 'या' व्हायरसचे रुग्ण, आयसीएमआरने दिला इशारा