हैदराबाद : भारत देशात पंचायत राज व्यवस्था कार्यरत आहे. त्यामुळे देशातील अंतर्गत कारभार पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येतो. त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही सार्वभौम मानली जाते. या पंचायत राज व्यवस्थेतून ग्रामीण भागातील कारभार सुरू करण्यात येतो. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिलला साजरा करण्यात येतो.
काय आहे पंचायत राज दिनाचा इतिहास :लॉर्ड रिपन या इंग्रज अधिकाऱ्याला भारतीय पंचायत राज व्यवस्थेचा जनक मानले जाते. लॉर्ड रिपनने भारतात 12 मे 1882 ला स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या आहेत. त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव दिले. त्यानंतर 24 एप्रिल 1993 ला 73 वी घटना दुरुस्ती करुन पंचायत राज व्यवस्था अधिकृत करण्यात आली. पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील बगदरी गावात 2 ऑक्टोबर 1959 पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था सुरू केली. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 ला राष्ट्रीय पंचायत राज दिनाची घोषणा केली. तेव्हापासून भारतात 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो.