हैदराबाद :National Nutrition Week 2023 ज्याप्रमाणे कार चालवण्यासाठी पेट्रोलची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला चालण्यासाठी अन्नाची गरज असते. परंतु शरीर निरोगी राहण्यासाठी, प्रत्येक वयात तंदुरूस्त राहण्यासाठी आणि शरीरातील सर्व यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यासाठी, शरीराला आवश्यक प्रमाणात पोषण मिळत राहणे फार महत्वाचे आहे. शरीरासाठी पोषणाचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु विविध कारणांमुळे मोठ्या संख्येने लोक, विशेषत: लहान मुले आवश्यक प्रमाणात पोषण आहार घेऊ शकत नाहीत, त्यामुळे कुपोषणाचे बळी होतात.
निरोगी पोषण ही सर्वात मोठी गरज: प्रत्येक व्यक्तीच्या विशेषतः मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी निरोगी पोषण ही सर्वात मोठी गरज आहे. अशा परिस्थितीत लोकांना संतुलित आणि पौष्टिक आहाराचे फायदे आणि गरजेबद्दल, निरोगी, तंदुरुस्त राहण्यासाठी, पौष्टिक आणि संतुलित आहाराचा अवलंब करण्यासाठी आणि संबंधित सरकारी धोरणे - योजनांबद्दल सर्वसामान्यांना जागरूक करणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह एका विशेष थीमसह साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023 हा “सर्वांसाठी परवडणारा आरोग्यदायी आहार” या थीमवर साजरा केला जातोय.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा इतिहास : भारतातील सामान्य लोकांमध्ये, विशेषत: मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबद्दल लोकांना जागृत करणे या उद्देशाने भारत सरकारच्या अन्न व पोषण मंडळाने 1982 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यास सुरूवात केली. खरं तर भारतापूर्वी पोषणाच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने इतर काही देशांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर, मार्च 1975 मध्ये अमेरिकन डायटेटिक असोसिएशन किंवा सध्या अकादमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स म्हणून ओळखल्या जाणार्या पहिल्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शरीरासाठी आवश्यक पोषणाची गरज आणि आहारतज्ज्ञांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या साप्ताहिक कार्यक्रमाला स्थानिक लोकांचा सकारात्मक प्रतिसाद तर मिळालाच पण जागतिक स्तरावरही या उपक्रमाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर 1980 मध्ये हा कार्यक्रम आठवड्याऐवजी महिनाभर साजरा केला जाऊ लागला.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन : यानंतर भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने देखील 1982 मध्ये 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत अनेक सेमिनार, कार्यशाळा, शैक्षणिक कार्यक्रम, परिषदा आणि जनजागृती मोहिमेचे आयोजन सरकारी आणि निमसरकारी संस्था आणि संघटनांद्वारे केले जाते.
कुपोषणमुक्तीसाठी सरकारी योजना: मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी बालपणात योग्य पोषण हे खूप महत्वाचे आहे. हे त्यांना शिकण्यास, खेळण्यास, सहभागी होण्यास आणि समाजात योगदान देण्यास सक्षम करते. त्याचबरोबर महिलांमध्ये विशेषतः गरोदर महिलांच्या कुपोषणाबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. परंतु अज्ञान, उपलब्धतेचा अभाव आणि इतर अनेक कारणांमुळे कुपोषणाची समस्या नेहमीच लहान मुले व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सरकारी प्रयत्न आणि धोरणांचा परिणाम म्हणून कुपोषणाच्या हानीबद्दल आणि मोठ्या प्रमाणात पोषणाची आवश्यकता याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरत आहे. त्याचबरोबर सरकारी योजनांमुळे अन्नासंबंधीच्या सुविधाही काही प्रमाणात गरजू लोकांपर्यंत आणि मुलांपर्यंत पोहोचत आहेत. त्याचा परिणाम कुपोषणाशी संबंधित आकडेवारीवरही होताना दिसत आहे. युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार, सध्या भारतात 0 ते 6 वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांच्या संख्येत 14% पेक्षा जास्त घट झाली आहे. जी गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. मात्र या दिशेने सातत्याने प्रयत्नांची गरज आहे.
भारत सरकारकडून कुपोषण दूर करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.
- सक्षम अंगणवाडी आणि मिशन पोषण २.०: यामध्ये, मिशन पोशन 2.0 अंतर्गत देशभरातील 13.9 लाख अंगणवाडी केंद्रांसह 7074 मंजूर प्रकल्प कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्र, शाळा आणि ग्रामपंचायत स्तरावर पोशन वाटिका इत्यादी योजना.
- प्रधानमंत्री मातृ वंदन योजना: गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण वितरण योजना, ज्या अंतर्गत गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची अंगणवाडी सेवेसाठी ICT अनुप्रयोग किंवा पोषण ट्रॅकरवर नोंदणी केली जाते.
हेही वाचा :
- Almond Oil : डार्क सर्कलपासून ते चेहऱ्यवरील दाग-धब्बे दूर करण्यापर्यंत उपयोगी ठरते बदामाचे तेल...
- Lemon water benefits : अनोशा पोटी लिंबू पाणी पिणे कधीही चांगले; जाणून घ्या काय आहेत फायदे...
- Blood deficiency in women : महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेने दिसतात ही लक्षणे; करू नका दूर्लक्ष...