क्युबेक सिटी (कॅनडा) : कोवीड -१९च्या प्रतिजैविकाचा एक डोस दिलेल्या उंदीराने सुमारे दहा दिवसानंतर याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे मेडीकगो या औषधी कंपनीने शुक्रवारी जाहीर केले. या कंपनीचे मुख्यालय क्युबेक सिटी याठिकाणी आहे.
“हा सकारात्मक परिणाम कोरोना विषाणूवर पुढील वैद्यकीय अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जेव्हा दुसऱ्या डोसचे निकाल उपलब्ध होतील तेव्हा मेडिकगो कंपनी कॅनडाच्या आरोग्य विभागाकडे चाचण्या घेण्यासाठीचा अर्ज सादर करेल आणि ही नवीन लस अमेरिकेतील ‘एफडीए’कडे परिक्षणासाठी पाठवली जाईल. त्याचबरोबर लवकरात लवकर मानवावर या औषधाची चाचणी घेता यावी यासाठी परवानगी घेण्यात येईल,” असे मेडिकगो कंपनीच्या सायंटिफिक अँड मेडीकल अफेअर्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष नॅथली लँड्री यांनी सांगितले.
“एवढ्या कमी वेळेत हे विश्वासपूर्ण काम आमच्या कंपनीने करुन दाखवल्याने आणि ही लस कॅनडात विकसित झाल्याने आम्हाला खुप प्रोत्साहन मिळाले आहे, असेही त्या म्हणाल्या.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी या लसची नेमक्या किती डोसची गरज असेल हे अद्याप निश्चित केलेले नाही. मात्र मेडिकगोच्या अंदाजानुसार सध्याच्या क्यूबेक आणि उत्तर कॅरोलिनामध्ये या दोन औषध उत्पादन केंद्रामधून अनुक्रमे २० दशलक्ष आणि १०० दशलक्ष एवढ्या डोसचे वार्षिक उत्पन्न घेऊ शकतो. जगाची गरज लक्षात घेऊन ही कंपनी या वर्षाच्या अखेरीपर्यंत लाखो डोसची उपलब्धता करुन देऊ शकते.
“२०२२ पर्यत आम्ही कॅनडामध्ये आणखी २० दशलक्ष डोस आणि उत्तर कॅरोलिनामध्ये १०० दशलक्ष डोसचा वाढीव उत्पादन घेण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. क्युबेकमधील आमच्या आणखी एका औषधी कंपनीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर ही कंपनी प्रतिवर्षी १ अब्जापेक्षा अधिक कोवीड -१९ लसीचे डोसचे उत्पादन घेण्यास सक्षम असेल,” असे मेडिकगोचे कार्यकारी उपाध्यक्ष मायकेल शुंक यांनी सांगितले.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा सार्स-सीओव्ही-2 या विषाणूची जनुकं शोधली गेली. त्यानंतर अवघ्या २० दिवसांच्या आत या कंपनीने कोरोना विषाणू सारखा कण (व्हीएलपी) तयार केला होता. आणि त्वरीत प्राथमिक वैद्यकिय चाचण्याही सुरु केल्या. हा उन्हाळा संपण्यापूर्वी कोवीड-१९च्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकिय चाचण्या सुरू करण्याचा मानस या कंपनीचा आहे. या चाचण्यांनतर दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अभ्यास या वर्षाच्या शेवटीपर्यंत सुरु होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत मेडिकगो ही कंपनी जगातील अग्रेसर कंपनी आहे. फ्ल्यु रोगाला सगळ्यात अगोदर प्रतिसाद देवून त्यांनी त्यांची क्षमता अगोदरच सिद्ध केली आहे. त्याचबरोबर २००९ मध्ये या कंपनीने अवघ्या १९ दिवसांत H1N1 या आजारावर संशोधन करुन लस तयार केली होती. तर २०१२ मध्ये, मेडिकगोने अमेरिकेच्या डिफेन्स एडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी (डीआरपीए) साठी एका महिन्याच्या आत मोनोव्हॅलेंट इन्फ्लूएंझाच्या १० दशलक्ष डोसची निर्मिती करुन दाखवली होती.
अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाचा भाग असलेल्या बायोमेडिकल अॅडव्हान्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट अॅथोरिटी (बीएआरडीए) साठी मेडिकगो कंपनीने २०१५ साली इबोला रोगावरील मोनोक्लोनल अॅन्टीबॉडीचे उत्पादन सर्वात जलद गतीने घेतले होते.
या कंपनीचे पहिले उत्पादन ‘इन्फ्लूएंझा’ या रोगावरील एक महत्त्वपूर्ण लस म्हणुन सध्या सक्रिय आहे. तसेच ही कंपनी सध्या कॅनडा सरकारसोबत २५ हजारांपेक्षा अधिक विविध वैद्यकीय प्रकल्पावर मजबूत, सुरक्षित आणि परिणामकारकतेसाठी एकत्रितपणे काम करत आहे.