नवी दिल्ली :एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक वस्तुंच्या किमतीतही बदल घडून येतात. याचा आपल्या जीवनावर अनेक प्रकारचा परिणाम होतो. नवीन आर्थिक वर्षात कारच्या किमती वाढून सोन्याच्या दरातही बदल होतात. त्यामुळे जाणून घेऊया नेमके नवीन आर्थिक वर्षात काय बदल होणार आहेत, याविषयीची माहिती.
सिलिंडरच्या किमतीत बदल :दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. गेल्या महिन्यातही गॅसच्या दरात वाढ झाली होती. आता शनिवारीही गॅसच्या दरात बदल दिसून येऊ शकतात. यासोबतच सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही बदल झाल्याचे दिसून येऊ शकते. नवीन आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठ्य़ा प्रमाणावर फरक जाणवू शकतो.
सोने विक्रीचे नियमबदलणार:सरकारने 4 अंकाऐवजी 6 अंकाच्या हॉलमार्कला वैधता दिली होती. त्यामुळे अगोदरच्या चार अंकी हॉलमार्कला आता बंदी असेल. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सोन्याचे दागिने विक्रीचे नियम बदलणार आहेत. शनिवारपासूनच नवीन दागिन्यांवर हे नियम लागू होणार आहेत. नवीन दागिन्यांवर सहा अंकी हॉलमार्क अनिवार्य केला असला, तरी ग्राहक त्यांचे जुने दागिने हॉलमार्कशिवाय विकू शकत असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.