हैदराबाद -जगाने आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रगतीला शह देवून कोरोना विषाणूने जगाला गुडघे टेकायला भाग पाडले आहे. “कोविड-१९ या साथीच्या रोगाने अवघ्या जगाचे जनजीवन विस्कळीत केले आहे. त्याचबरोबर अनेकांच्या रोजीरोटीला आणि अलिकडच्या काळात आरोग्य क्षेत्रात जगाने केलेल्या प्रगतीला धोका निर्माण केला आहे,” असे २०२०च्या वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्समध्ये म्हटले आहे.
या अहवालानुसार, आरोग्य क्षेत्रातील काही भागात प्रगती रखडली आहे. पण मलेरिया सारखा रोग पून्हा डोके वर काढू शकतो या भितीने अलिकडच्या काळात लसीकरण करण्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयसस म्हणाले, " आरोग्याच्या दृष्टीकोनातुन चांगली बातमी अशी आहे की, जगभरातील लोक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगत आहेत. पण एक वाईट बातमी अशी आहे की, कोरोनावर मात करण्यासाठी ठोस उपाय शोधण्यासाठी जगाचे प्रयत्न खुप मंद गतीने सुरु आहेत."
कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसाचा आजार आणि स्ट्रोक यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाय नसणाऱ्या आजारांना प्रतिबंधित करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे कमतरता जाणवते, असेही ते म्हणाले.
कमी आणि मध्यम उत्पन्न असणार्या देशांमध्ये आरोग्य सेवेचे कव्हरेज श्रीमंत राष्ट्रांच्या तुलनेत अगदी कमी आहे. तसेच तेथील आरोग्य कर्मचार्यांच्या घनतेतही भिन्नता आहे.
जगातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक देशांमध्ये प्रत्येकी १० हजार लोकसंख्येमागे केवळ १०पेक्षा कमी डॉक्टर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे जगातील एकूण देशांपैकी ५५ टक्क्यांपेक्षा अधिक देशांमध्ये प्रत्येकी १० हजार लोकसंख्येमागे ४० पेक्षा कमी नर्सिंग आणि प्रसुती कर्मचारी आहेत.
टेड्रोस म्हणाले की, या महामारीने कोरोना सारख्या रोगांवर सर्वोत्तम संरक्षण उपाय म्हणून सर्व देशांनी आरोग्य क्षेत्रात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. “आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य सुरक्षा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,” असेही ते म्हणाले
आरोग्य क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा कमी उत्पन्न असणार्या देशांना सर्वात जास्त फायदा झाल्याचे नोंदले गेले आहे. २००० ते २०१६ या काळात कमी उत्पन्न असणाऱ्या देशांतील लोकांचे आयुर्मान २१ टक्क्यांनी वाढले आहे. ते अधिक उत्पन्न असलेल्या श्रीमंत देशांच्या तुलनेत ४ टक्कांनी अधिक आहे.
आयुर्मान वाढलेल्या देशांमध्ये एक महत्त्वाचा घटक होता, तो म्हणजे एचआयव्ही, मलेरिया आणि क्षयरोगांसारख्या रोगाला रोखण्याची आणि त्यावर उपचार करण्याची मिळालेली संधी. तसेच गिनी अळी सारख्या उष्णकटिबंधीय आजाराच्या रुग्णांच्या संख्येत झालेली कमी. त्याचबरोबर माता आणि बाल आरोग्यसेवेत झालेली सुधारणा ज्यामुळे २००० ते २०१८ दरम्यानच्या काळात बालमृत्यूचे प्रमाणही घटले झाले.
डब्ल्यूएचओच्या सहाय्यक महासंचालक डॉ. समीरा अस्मा म्हणाल्या, की कोविड-१९ महामारीने आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीतून जगभरातील लोकांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला आहे. तसेच सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज आणि निरोगी लोकसंख्येस प्रोत्साहन देण्यासाठी मूलभूत स्वच्छतेच्या सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे. आणि त्यासाठी विविध क्षेत्रांद्वारे लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर आरोग्यासाठी वैयक्तिक पैसे खर्च करण्याची कुवत हे आरोग्य क्षेत्रासमोरचे एक मोठे आव्हान आहे. २०२०मध्ये अंदाजे १ अब्ज लोकांना त्यांच्या घरगुती खर्चापैकी किमान १० टक्के खर्च आरोग्य सेवेवर करावा लागणार आहे, असा अंदाज डब्ल्यूएचओने लावला आहे. त्यांच्या अंदाजानुसार यापैकी बहुतेक लोक हे कमी मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील असतील.
एकंदरित अशी परिस्थिती असताना लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे, या आव्हानांवर काम केले जाईल की नाही? हे पुढील आठवड्यात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या ७३ व्या जागतिक आरोग्य असेंब्लीच्या अजेंड्यावर अवलंबून आहे. परंतु डब्ल्यूएचओ प्राधान्याने कोविड-१९ वर लक्ष केंद्रित करेल. त्यासाठीची सदस्य राष्ट्रांची ही बैठक १८ ते १९ मे दरम्यान पार पडेल.