हैदराबाद Lal Bahadur Shastri Death Anniversary 2024 :साधेपणा, इमानदारी, प्रखर देशभक्त म्हणून भारतीय राजकारणात लाल बहादुर शास्त्री यांची ओळख आहे. मात्र ताश्कंद करार करण्यासाठी गेलेले पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा सोयीयत संघात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचं तेव्हा सांगितलं गेलं. मात्र आजही भारतीयांपुढं त्यांच्या मृत्यूचं गुढ उकललं नाही. 'जय जवान, जय किसान' असा नारा पहिल्यांदा देणाऱ्या देशाच्या या पंतप्रधानांचं पार्थिवचं परत भारत मातेच्या स्वाधिन करण्यात आलं. आज 11 जानेवारीला त्यांचा स्मृती दिन, त्यानिमित्त जाणून घेऊया, त्यांच्या जीवनप्रवासाची कहानी.
लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म : लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील तत्कालिन मुगलसराय आणि आता दिन दयाल उपाध्याय नगर इथं 2 ऑक्टोबर 1904 मध्ये झाला. त्यांचे वडील शिक्षक होते, त्यामुळं लहानपणापासून त्यांच्यावर प्रखर देशभक्तीचे संस्कार झाले. त्यांच्या वडिलांचं नाव मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव होतं. मात्र काशी विद्यापीठात शिक्षण घेताना त्यांना शास्त्री ही पदवी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपलं श्रीवास्तव हे आडनाव बदलून ते शास्त्री असं केलं. त्यांचा विवाह 1928 मध्ये ललिता देवी यांच्यासोबत झाला. लाल बहादुर शास्त्री आणि ललिता देवी या दाम्पत्याला 6 मुलं झाली, यात कुसुम, सुमन या दोन मुली, तर हरिकृष्ण, अनिल, सुनील आणि अशोक या चार मुलांचा समावेश होता.
स्वातंत्र्य लढ्यात योगदान :लाल बहादुर शास्त्री हे लहानपणापासूनच प्रचंड देशभक्त होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या हिरीरीनं सहभाग नोंदवला. लाल बहादुर शास्त्री यांनी 1921 असहकार आंदोलन, 1930 मध्ये महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानंतर 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनातही त्यांनी सहभागी होत आंदोलन केलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान झाले, तर दुसरे पंतप्रधान होण्याचा बहुमान लाल बहादुर शास्त्री यांना मिळाला. स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिल्यामुळं मीठ सत्याग्रहात त्यांनी 1930 मध्ये त्यांना अडीच वर्ष तरुंगवास भोगावा लागला. तर 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना चार वर्ष तरुंगवास भागावा लागला. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानामुळं त्यांना तब्बल 9 वेळा तरुंगात जावं लागलं.
लाल बहादुर शास्त्री यांनी परदेशात घेतला शेवटचा श्वास :लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जून 1964 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतलीत्यानंतर 1965 मध्ये पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला, त्यावेळी लाल बहादुर शास्त्री यांनी मोठ्या निकरानं लढा दिला. यावेळी त्यांनी 'जय जवान जय किसान' हा नारा दिला. भारतानं लाहोरपर्यंत मुसंडी मारली, यावेळी लाल बहादुर शास्त्री पाकिस्तानला जिंकलेली जमीन परत द्यायला तयार नव्हते. यावेळी अमेरिका आणि रशियाच्या मदतीनं त्यांनी 10 जानेवारी 1966 ला ताश्कंद करार केला. मात्र ताश्कंद करार केल्यानंतर काही तासातच 11 जानेवारी 1966 मध्ये त्यांचा रहस्यमयी मृत्यू झाला. आज देशाचे इमानदार, साधेपणा जपणारे देशभक्त पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा स्मृतीदिन, त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतकडून विनम्र अभिवादन.
हेही वाचा :
- प्रवासी भारतीय दिन 2024 : जगभरात अनिवासी भारतीयांचा 'डंका', जाणून घ्या प्रवासी भारतीय दिनाचा इतिहास
- 'मराठी पत्रकार दिन' 2024; कोण होते 'दर्पण'कार ?
- 'जागतिक हिंदी दिवस' 2024; हिंदी भारतातच नाही तर परदेशातही आहे लोकप्रिय