हैदराबाद - हिवाळ्यामुळे आपण आळशी बनतो. पण, या ऋतूत नियमित योग केला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. हिवाळ्यात हवा कोरडी राहते. त्याचा थेट परिणाम आपल्या चयापचय क्रियेवर होतो. योग आणि आयुर्वेद तुम्हाला या बदलत्या ऋतूशी जुळवून घेण्यास मदत करतात. त्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि व्यायाम यात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. मुंबईच्या योग तज्ज्ञ निष्ठा बिजलानी यांनी 'थंडीशी कसा सामना करायचा'? याचे मार्गदर्शन केले आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करा. यामुळे तुम्हाला हिवाळ्यात होणारा अपचनाचा त्रास होणार नाही आणि तुमचे पोट एकदम स्वच्छ राहील.
खालील योग क्रियाही करायला हव्यात -
१) कपालभाती -
कपालभाती अग्नी श्वास म्हणूनही ओळखली जाते. यामुळे तुमच्या शरीरात अग्नी प्रज्वलीत होतो. कपालभातीमुळे पाचनक्रिया सुधारते आणि श्वसनाचे कार्य चांगले राहते. कपालभाती नियमित केल्याने फुफ्फुसे स्वच्छ राहतात, शरीरातले विषारी पदार्थ निघून जातात आणि सायनसही मोकळा होतो.
पद्धत -
मांडी घालून चटईवर बसा किंवा खुर्चीवर ताठ बसा. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत घ्या आणि मग एकामागोमाग श्वासाचे २० स्ट्रोक सोडा. हे करताना डोळे आणि तोंड बंद ठेवा. श्वास नाक आणि पोटातून बाहेर आला पाहिजे. श्वास सोडताना आवाज येईल. तुमच्या लक्षात येईल की श्वासाचे स्ट्रोक सोडताना पोट आत खेचले जाईल. चेहरा आणि शरीरावर ताण ठेवू नका.तुम्ही हळूहळू ५० स्ट्रोकपर्यंत वाढवू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही करू शकता. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी कपालभाती करावी. गरोदर स्त्रिया, मासिक पाळीत आणि उच्च रक्तदाब असेल तर मात्र कपालभाती करू नका.
२) भस्त्रिका -
कपालभातीप्रमाणे भस्त्रिकाची श्वासोच्छवासाचीच क्रिया आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि शरीरात तयार झालेले विषारी पदार्थ काढून टाकले जातात. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि तुम्हाला हलके, आरामदायी वाटू लागते.
पद्धत -
चटई किंवा खुर्चीवर आरामदायी स्थितीमध्ये बसा. श्वासाच्या लयीबरोबर तुम्ही तुमचे हात वर – खाली करा. श्वास आत घेताना हात वर आणि सोडताना हात खाली करा. श्वासोच्छवास आणि त्या लयीत हात वर – खाली करणे सतत करा. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी भस्त्रिका करावी. गरोदर स्त्रिया, मासिक पाळीत आणि उच्च रक्तदाब असेल तर मात्र अजिबात करू नका.