हैदराबाद :कालाष्टमी व्रत हा भगवान कालभैरवाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी कालाष्टमी व्रत पाळले जाते. या दिवशी भगवान कालभैरवाचे भक्त दिवसभर उपवास करुन कालभैरवाची पूजा करतात. याच दिवशी भगवान शिव कालभैरवाच्या रूपात प्रकट झाल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे शिवभक्त कालभैरवाची मोठ्या भक्ती भावाने पूजा करतात. कालभैरव जयंतीला भैरव अष्टमी असेही म्हणतात. त्यामुळे नेमकी कालाष्टमी काय आहे, कालभैरवाची पूजा विधी कशी करतात, कालभैरवाचे महत्व काय आहे, याबाबतची माहिती आपण या लेखातून जाणून घेऊ.
कधी आहे कालाष्टमी :हिंदू धर्मातील ग्रंथानुसार व्रतराज कालाष्टमीचे व्रत ज्या दिवशी रात्री अष्टमी तिथी येते त्या दिवशी पाळण्याचे सांगितले जाते. सप्तमी तिथीला कालाष्टमी व्रत पाळता येत असल्याचेही ज्योतिष्य शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. यावर्षी कालाष्टमी शुक्रवारी 12 मे रोजी आले आहे. कालाष्टमीची तिथी 12 मे रोजी सकाळी 09.07 वाजता सुरू होणार आहे. तर कालाष्टमी तिथी 13 मे रोजी सकाळी 06.51 मिनीटांनी समाप्त होणार असल्याची माहिती ज्योतिष्य तज्ज्ञांनी दिली आहे.