हैदराबाद International Students Day 2023: जागतिक पातळीवर 17 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा होत आहे. नाझींनी दुसऱ्या महायुद्धात ठार केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. जगातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, हा त्यामागचा उद्देश आहे. जगभरातील अनेक विद्यार्थी आपला देश सोडून परदेशात शिकायला जातात. त्यांना येणाऱ्या अडचणीवर या दिवशी प्रकाश टाकण्यात येतो.
काय आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास : दुसऱ्या महायुद्धात नाझी सैन्यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय केले होते. प्राग विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या 9 विद्यार्थ्यांना नाझी सैनिकांनी ठार केलं होतं. त्यामुळे विद्यार्थी आंदोलन चिघळल्यानं विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग घेतला. मात्र नाझी सैनिकांनी तब्बल 1 हजार 200 विद्यार्थ्यांना शिबिरात पाठवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता. या 1 हजार 200 विद्यार्थ्यांमधील अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. नाझी सैन्यांला भिडलेल्या या विद्यार्थ्यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येतो.