हैदराबाद : जगभरात रस्त्यावर आयुष्य जगणाऱ्या मुलांचा विदारक प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांच्या विविध अडचणी सुजाण नागरिकांना भेडसावतात. या मुलांच्या शैक्षणिक, निवारा, इतकेच काय उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र कोणतीच सोय उपलब्ध नसल्याने या मुलांना रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येते. त्यामुळे या मुलांच्या भविष्याच्याबाबत जनजागृती करण्यासाठी 12 एप्रिलला इंटरनॅशनल स्ट्रीट चिल्ड्रेन डे साजरा करण्यात येते.
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची किती आहे संख्या :जगभरात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची समस्या भारतातही मोठी आहे. जगभरात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या किमान 100 ते 150 मिलियन असल्याचा दावा विविध साईटवरील अहवालानुसार करण्यात येतो. त्यामुळे जगभरातील 100 ते 150 मिलियन मुले रस्त्यावर आपले आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट होते. या मुलांना कोणत्याही शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न बिकट असल्याने त्यांना रस्त्यावर भीक मागून आयुष्य जगावे लागते.
काय आहे इंटरनॅशनल स्ट्रीट चिल्ड्रेन डेचा इतिहास :युनोने 1989 ला मुलांच्या हक्कांसाठी एका सभेचे आयोजन केले होते. त्यानुसार रस्त्यावरील मुलांच्याबाबत विविध प्रकारचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार या मुलांना प्रेमळ वातावरणात वाढ, त्यांना आरोग्य आणि पोष्टीक खाद्य, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, स्वातंत्र्य आदी विविध सुविधा पुरवण्यासाठी सगळ्या देशांनी सहकार्य करण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे इतर देशांनीही याबाबत विविध सुविधा रस्त्यावरील मुलांना देण्याचे प्रयत्न सुरू केले. या सभेनंतर 12 एप्रिल 2011 पासून इंटरनॅशनल स्ट्रीट चिल्ड्रेन डे साजरा करण्याला सुरुवात झाली.