हैदराबाद International Mens Day 2023 : जगभरातील पुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुषदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी सकारात्मक पुरुषत्वाला चालना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. पुरुषांचं होणारं शोषण, त्यांच्या अडचणी, भेदभाव आदींवर आंतरराष्ट्रीय पुरुषदिनी प्रकाश टाकण्यात येतो.
काय आहे आंतरराष्ट्रीय पुरुषदिनाचा इतिहास :टोबॅगो इथं डॉ जेरोम तेलुक्सिंग यांनी आंतरराष्ट्रीय पुरुषदिनाची संकल्पना 1992 मध्ये मांडली. पुरुषांच्या मानसिक आरोग्य समस्या, लैंगिक समानता, निरोगी जीवनशैली आणि सकारात्मक पुरुष रोल मॉडेल प्रदान करणं हे आंतरराष्ट्रीय पुरुषदिनाचं उद्दिष्ट आहे. सध्या जगभरातील 60 देशात आंतरराष्ट्रीय पुरुषदिन साजरा करण्यात येतो. भारतात पहिल्यांदा 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरुषदिन साजरा करण्यात आला.
काय आहे आंतरराष्ट्रीय पुरुषदिनाची थीम :सध्या धावपळीच्या जीवनात जागतिक पातळीवर पुरुषांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे पुरुषांच्या आत्महत्येची प्रकरणं कमी करुन त्यांना निरोगी आणि आनंदी वातावरणात जीवन जगण्याला प्रोत्साहन देणं, ही जागतिक पातळीवरची गरज आहे. त्यामुळे 'शून्य पुरुष आत्महत्या' ही थीम घेऊन यावर्षी आंतरराष्ट्रीय पुरुषदिन साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचं मिशन पुरुषांच्या सामाजिक अडथळ्यांना आणि गैरसमजांना तोंड देण्याचं आहे. पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पुरुषदिनी जागतिक पातळीवर करण्यात येत आहे.
तिपटीनं वाढल्या पुरुषांच्या आत्महत्या : द लॅन्सेट रिजनल हेल्थद्वारे ऑगस्ट 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात भारतातील पुरुष आत्महत्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे. गेल्या सात वर्षात पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुरुष आत्महत्येची संख्या 2014 मध्ये 89 हजार 129 होती, मात्र 2021 मध्ये 1 लाख 18 हजार 979 वर पोहोचली. यात 2014 मध्ये 4 हजार 521 आणि 2021 मध्ये 45 हजार 026 महिलांनी आत्महत्या केली आहे. 2021 मध्ये विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण तिप्पट होतं. आरोग्य आणि कौटुंबीक कलह हे पुरुषांच्या आत्महत्येला मोठं कारण असल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस 2023 : आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवसाचा काय आहे इतिहास? जाणून घ्या यंदाची थीम
- वर्ल्ड प्रिमॅच्युरिटी डे : प्रिमॅच्युअर बाळाचा विकास मंदावतो, जाणून घ्या कोणत्या महिन्यात बाळ काय शिकते