महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

बाळाला दात येताना... - बाळ दात येणे प्रक्रिया

साधारण बाळ सहा महिन्यांचे झाले की, त्यानंतर दात येण्याची प्रक्रिया सुरू होते. हे बाळाचे दुधाचे दात असतात. दात येताना बाळाला त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

बाळाला दात येताना
teething in babies

By

Published : Sep 26, 2020, 7:26 PM IST

हैदराबाद - बाळाला दात येण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा बाळाच्या हिरडीतून पहिला दात बाहेर डोकावतो. त्यानंतर मग हळूहळू बाळ स्तनपान सोडून घन आहाराकडे वळते. बाळ मोठे होत असताना त्याच्या आरोग्यदायी पोषणासाठी घन आहाराची गरज असते. हैदराबादच्या रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे एमडीएस आणि कन्सल्टंट, बालरोग दंतचिकित्सक, डॉ. श्रीनिवास नामनेनी म्हणतात, ‘ साधारण वयाच्या ६ महिन्यापासून ते १८ महिन्यापर्यंत दात येतात. दात १८ ते २० महिन्यांनीही बाळाला दात आले नाहीत तर मात्र पालकांनी बालरोग दंतचिकित्सकाचा सल्ला घ्यावा. अशा वेळी दात येण्याची समस्या असू शकते किंवा अनुवांशिक अडचणी असू शकतात.'

नवजात दात -

बाळाच्या आयुष्यात दात येण्याचा काळ कठीण असू शकतो. डॉ. श्रीनिवास यांनी सांगितल्याप्रमाणे कधी-कधी बाळाला जन्मजात दात असतात. यांना नवजात दात म्हणतात. दातांची स्थिती कशी आहे, यावरून ते काढायचे की नाही हे ठरवले जाते. अशा स्थितीत येणाऱ्या सर्वसाधारण समस्या पुढीलप्रमाणे -

  • आईला स्तनपान देताना त्रास सहन करावा लागतो.
  • दात सैल आणि लटकते असतात.
  • बाळाच्या जिभेखाली अल्सर असू शकतो.

या तीन स्थितीत दात काढणे आवश्यक असते. अशा बाळांना पुन्हा दात येतात, त्यामुळे पालकांनी काळजी करू नये.

दात येतानाच्या समस्या -

डॉ. श्रीनिवास पुढे सांगतात की, दात येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरापेक्षा वेगळा असलेला शरीरातला हा सर्वात कठीण भाग असतो. त्यामुळे दातावर जिवाणू येतात आणि एकदा का दात आले की मग जिवाणू तिथे राहायला येतात. काही वेळा बाळाचे शरीर जिवाणू स्वीकारत नाही. त्याचा परिणाम म्हणून बाळाच्या हिरड्यांना सूज येणे, चिडचिड होणे, थोडा ताप येणे इत्यादी समस्या उद्भवतात. बाळ दुसऱ्या वस्तू घेऊन चघळायला लागतो. त्यामुळे जिवाणूंच्या दुसऱ्याही समस्या सुरू होतात. पहिल्यांदा दात येतात, तेव्हाच या समस्या निर्माण होतात.

एकदा बाळाला दात आले की खूप काळजी घ्यावी लागते. कारण या नव्या दातांमुळे बाळाला अर्ली चाइल्डहूड डेंटल कॅरीज (ईसीसी)ला तोंड द्यावे लागते. हे जलद पसरते आणि वेदनादायी असू शकते. म्हणून दुर्लक्ष करू नका आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

बाळाला दात येताना कशी घ्यावी काळजी?

  • बाळाच्या हातात स्वच्छ असलेल्याच वस्तू द्या.
  • बाळ ६ महिन्यांचे झाले की बाळाचे डेंटल चेकअप करा. दात येण्यापूर्वीच तपासून घेतले तर जास्त चांगले. त्यामुळे कशी काळजी घ्यावी, हे आधीच कळू शकेल.
  • बाळाला खाऊ घालण्याचे वेळापत्रक काय असावे आणि कशा प्रकारे खाऊ घालावे हेही समजून घेता येईल.
  • पहिला दात आल्यावर दात स्वच्छतेचा सल्ला दिला जातो. सहाव्या महिन्यात निर्जंतूक सुती कापडाचा वापर करा आणि दात पुसून घ्या. म्हणजे दुधाचा अंश राहणार नाही.
  • ८ ते १० महिन्यात सिलिकॉन फिंगर ब्रश वापरा. एका वर्षानंतर चांगला बेबी ब्रश वापरा.
  • फ्लोराइड नसलेल्या टुथपेस्टपासून सुरुवात करा, २ ते ३ महिन्यानंतर १००० पीपीएम फ्लोराइड असलेली टुथपेस्ट द्या.
  • राइस ग्रेन टुथपेस्टने सुरुवात करा.
  • शक्यतो दिवसातून दोनदा तरी दात घासा. दात घासण्याची अशी खास पद्धत नाही. फक्त दात स्क्रब करा.
  • दोन वर्षांपर्यंत अतिरिक्त साखर टाळा. नाहीतर मुलाला गोडाची आवड निर्माण होईल आणि त्याने इतर अनेक समस्या होऊ शकतात. चार वर्षापर्यंत चॉकलेट देऊ नका. चॉकलेटपेक्षा भारतीय मिठाईला पसंती देऊ शकता.

जेव्हा मुले जास्त बोलू शकत नाहीत, तेव्हा पालकांनी त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. दाताची कुठलीही समस्या उद्भवली तर ताबडतोब तज्ज्ञांना भेटा. पोषक आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली योग्य हास्याची गुरुकिल्ली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details