नवी दिल्ली :देशात मातृशिक्षणात वाढ झाल्यामुळे पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूत घट झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती हेल्थ अँड प्लेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून उघड झाली आहे. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील मातृशिक्षण आणि मुलांचे आरोग्य यांच्यातील संबंध शोधणारे हे पहिले संशोधन असल्याचा दावा या संशोधकांकडून करण्यात आला आहे.
मृत्यूदरावर शिक्षणाचा कसा होतो परिणाम : हे संशोधन ऑस्ट्रियातील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स अॅनालिसिस (IIASA) मधील संशोधक समीर के सी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी विकसनशील देशांमधील भविष्यातील लोकसंख्येची गतिशीलता समजून घेण्यासाठी पाच वर्षाखालील मृत्यूदरावर शिक्षणाचा कसा परिणाम होतो, हे समजून घेणे महत्वाचे असल्याचे नमूद केले आहे. या संशोधकांनी 1992 ते 1993 आणि 2019 ते 2021 दरम्यान केलेल्या भारतीय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS I-V) च्या पाच फेऱ्यांचे विश्लेषण केले. यात त्यांनी पाच वर्षांखालील मृत्यू दराची गणना प्रश्नावलीमधील डेटा वापरून केली आहे. यामध्ये महिलांच्या जन्म इतिहासाचा डेटा, मुलांची जन्मतारीख, जगण्याची स्थिती आणि प्रत्येक मुलाच्या बाबतची तपशीलवार माहिती गोळा करण्यात आली. प्रश्नावलीने वय, शिक्षण, धर्म, जात आणि पुनरुत्पादक वर्तन यासारखी अतिरिक्त माहिती देखील जमा केली आहे. गोळा केलेला डेटा नंतर पाच वर्षांखालील मृत्यूच्या अंदाजाचे विश्लेषण करण्यासाठी संगणक मॉडेलमध्ये देण्यात आल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.