हैदराबाद -१० फेब्रुवारी आणि १० ऑगस्ट या दोन दिवशी भारतात नॅशनल डीवर्मिंग डे म्हणजेच राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळला जातो. १ ते १४ वर्ष वयाच्या मुलांच्या आतड्यांमधल्या जंतांचे पूर्णपणे निर्मूलन करणे हा या दिवसांचा उद्देश आहे. लहान मुलांमध्ये विशेष करून गावात राहणाऱ्या मुलांना जंताची समस्या असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे भारतात १ ते १४ वयोगटातल्या २४१ दशलक्ष मुलांना जंत होण्याची शक्यता आहे. वेळेवर उपचार केला नाही, तर स्थिती आणखी बिघडून जाईल.
जंतनाशक दिनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आम्ही हैदराबादच्या रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे कन्सल्टंट नियोनॅटोलॉजिस्ट,एमडी एमआरसीपीसी (युके) असलेल्याडॉ. विजयनंद जमालपुरी यांच्याशी बातचीत केली.
जंतनाशक दिनाचे महत्त्व
मुलांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे
- यामुळे मुलांच्या शरीरात पोषक घटकांचे योग्य प्रकारे शोषण होईल.
- मुलांची शाळेतली उपस्थिती आणि उत्पादकता वाढेल.
- जंतांची समस्या तीव्र होण्यास प्रतिबंध होईल.
- अॅनिमिया आणि पोटाचे विकार कमी होतील.
- यामुळे मूल सक्रिय आणि कार्यशील राहील.
मातीतून संक्रमित होणारे परोपजीवी जंत कसे पसरतात?
डॉ. विजयनंद सांगतात, साॅइल ट्रान्समिटेड हेल्मिंथ ( एसटीएच ) म्हणजेच मातीतून संक्रमित होणारे परोपजीवी जंत दूषित अन्न किंवा दूषित हात यामुळे पसरतात. याचे सर्वसाधारण प्रकार म्हणजे राऊंडवर्म, व्हिपवर्म आणि हूकवर्म. जेव्हा एखादी संसर्ग झालेली व्यक्ती उघड्यावर शौचास बसते, तेव्हा हे जंतू शौचावाटे मातीत मिसळतात. मग ती दूषित माती अनेक प्रकारे संक्रमण पसरवते. फळे आणि भाज्या न धुता खाणे किंवा त्या कच्च्याच खाणे, जेवणाआधी हात न धुणे, शौचानंतर हात न धुणे, दूषित पाणी पिणे यामुळे संसर्ग होतो.