गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील हृदयरोगाच्या (Heart patients) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. चुकीची लाईफस्टाईल (Lifestyle), सदोष आहारपद्धती (Diet) आणि कामाच्या उलटसुलट वेळा (Irregular timings) यामुळे अनेकांच्या हृदयाचे आरोग्य बिघडू लागल्याचे गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सातत्याने वाढत चाललेले ताणतणाव आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता हीदेखील हृदयावर परिणाम करणारी कारणे आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अनेक सेलिब्रिटींचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याती दिसून आले. त्यामुळे आपल्याला अचानक हृदयरोगाचा झटका येतो आणि आपला मृत्यू होतो, असे अनेकजणांना वाटत असते.
हृदय (Heart) हे आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव असून आपल्या शरीराला प्राणवायू आणि पोषक घटकांसह रक्तपुरवठा करतं. आपलं हृदय प्रत्येक सेकंदाला काम करत असते. आपल्या हृदयाचे आरोग्य बिघडत चालले आहे, हे दाखवणारी अनेक लक्षणे आपल्याला दिसत असतात. त्यावर बारीक लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना सुरू करणे आवश्यक असते. जाणून घेऊया, हृदय कमकुवत होत चालल्याची कुठली लक्षणे दिसून येतात, याबाबत वाचा.
हृदयविकाराची कारणे:हृदयविकाराला कारणीभूत ठरणारे अनेक जोखमीचे घटक आहेत. जोखीम वाढवणारी जीवनशैली जसे की, मद्यपान, धूम्रपान, वर्जित पदार्थांचं सेवन यामुळे हृदयविकार बळावण्याची शक्यता कैकपटीने वाढते. शारीरिक हालचालींचा अभाव असलेली जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे असलेला लठ्ठपणा हा हृदयविकाराच्या झटक्यापासून ते हृदय निकामी होणे यासारख्या विकारांची जोखीम वाढवते. हृदयविकाराची जोखीम वाढण्याची अनेक कारणे असतात. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, यामध्ये कुटुंबात त्याबाबत असलेला वैद्यकीय इतिहास (हृदयाचा झटका, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी) आणि वाढते वय यांचा समावेश असतो. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यामध्ये जीवनशैली हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो.
हृदयविकाराची लक्षणे:
अचानक घाम येणे:हवामानातील उष्म्यामुळे किंवा जिममध्ये व्यायाम केल्यामुळे घाम येणे साहजिक आहे. मात्र अनेकांना एसी रूम मध्ये बसलेले असताना किंवा विनाकारण घाम येतो. असा घाम येणे, हे धोक्याचे लक्षण मानले जाते. तुम्हालाही असाच अनुभव येत असेल, तर तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.