कोलकाता : देशात एडेनोव्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा हादरा बसला आहे. मात्र देशभरात तपासण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यांपैकी 38 टक्के एडेनोव्हायरस बाधितांची संख्या पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीज (NICED) यांनी नुकतेच याबाबत सर्वेक्षण केले आहे. त्यातून अनेक बाबींचा खुलासाही करण्यात आला आहे. 1 जानेवारी ते 9 मार्च या कालावधीत देशभरातील विविध व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक प्रयोगशाळांमध्ये 1708 नमुन्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणात 650 नमुने एडेनोव्हायरस बाधित आढळल्याची माहिती एनआयसीडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बंगालमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण :इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीज (NICED) यांनी विविध राज्यातील रुग्णांच्या स्वॅबचे नमुने गोळा केले होते. त्यामधून धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे. एडेनोव्हायरसमुळे बाधित झालेले सर्वाधिक रुग्ण पश्चिम बंगालमध्ये आढळले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 650 नमुन्यांपैकी 38 टक्के बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर तामिळनाडू राज्यात 19 टक्के रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर केरळ राज्यात 13 टक्के रुग्ण आढळून आले असून केरळ हे तिसऱ्या क्रमांचे राज्य ठरले आहे. दिल्लीतही एडेनोव्हायरसचे 11 टक्के रुग्ण आढळून आले असून चौथ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात ५ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळून आलेल्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.
एडेनोव्हायरसने बंगालमध्ये घेतले सर्वाधिक बळी :एडेनोव्हायरसमुळे पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक बळी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र राज्यात एडेनोव्हायरसमुळे 19 बळी गेले आहेत. मात्र त्यातील ६ रुग्णांचा मृत्यू एडेनोव्हायरसमुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर बाकी रुग्णांना इतर आजाराची लागण झाल्याचेीह त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. मात्र आरोग्य विभागाच्या वतीने त्यांच्या दाव्याचे खंडन करत मृत्यूचा आकडा जास्त असल्याचे स्पष्ट केले आहे.