हैदराबाद : महाबली हनुमान यांची जयंती देशभरात 6 एप्रिलला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. महाबली हनुमान यांना रामाचे परमभक्त मानले जाते. त्यांनी केलेली प्रभू श्रीरामाची सेवा पाहून माता सीतेने हनुमान यांना नरक चतुर्दशीला अमरत्वाचे वरदान दिले होते. त्यामुळे देशात दिवाळीच्या एक दिवस अगोदरही हनुमान जयंती साजरी करण्यात येते.
भगवान शिवाचा रुद्रावतार :महाबली हनुमान यांचा जन्म त्रेतायुगातील चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाल्याची अख्यायिका रामायणात नमूद करण्यात आली आहे. प्रभू श्रीरामाचे परमभक्त म्हणून महाबली हनुमान यांची ख्याती आहे. मात्र त्यांना महादेवाचा 11 वा अवतार असल्याचेही मानण्यात येते. देवाधिदेव महादेव यांचा रुद्रावतार म्हणून रामायणात हनुमान यांची अख्यायिका वर्णन करण्यात येते. हनुमान यांची पूजा करून व्रत पाळल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे जीवनातील कोणत्याही प्रकारचा त्रास टळतो. हनुमान यांना संकटमोचक असेही म्हणतात. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती चालू असेल, त्यांनी हनुमान यांची पूजा करण्याचे सूचवण्यात येते. असे केल्याने शनि ग्रहाशी संबंधित समस्या दूर होत असल्याचा दावा करण्यात येतो. हनुमान यांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होत असल्याचा दावाही करण्यात येतो.
काय आहे पूजा विधी :परमभक्त हनुमान यांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला, त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर हनुमानांची पूजा करणे शुभ मानले जाते. यानंतर घराची स्वच्छता करुन गंगाजल शिंपडून घर स्वच्छ करावे. स्नान केल्यानंतर हनुमान मंदिरात किंवा घरात पूजा करावी. पूजेच्या वेळी हनुमानांच्या मूर्तीला शेंदूर अर्पण करावा. चमेलीचे तेल अर्पण केल्याने हनुमान प्रसन्न होत असल्याचे विविध धर्मग्रंथात नमूद करण्यात आले आहे. पूजेच्या वेळी पंचामृतासह अक्षता, फुले, गुलाल, उदबत्ती, नैवेद्य इत्यादी अर्पण करून तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर हनुमान यांच्या मूर्तीला विशेष पान अर्पण करावे. त्यात गुलकंद, बदाम टाकण्यात यावा. हे विशेष पान अर्पण केल्याने विशेष कृपा प्राप्त होत असल्याचे मत ज्योतिषशास्त्रज्ञ व्यक्त करतात. हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि हनुमान यांची आरती करण्यात यावी.