चंदीगड :मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे मद्याच्या बाटल्यांवर नमूद करण्यात आले आहे. मात्र तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात मद्यपान करत असल्याचे दिसून येते. मात्र मद्यपान केवळ आपल्या अवयवांनाच हानिकारक नाही, तर अति मद्यपानामुळे स्त्री पुरुषांमध्ये वंध्यत्व येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अनेक वेळा मद्यपान हा गर्भपाताचे कारण असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. वंध्यत्वाचे निदान केलेल्या 35 टक्के पुरुष आणि स्त्रियांमध्ये मद्यपान हे प्रमुख कारण असल्याचे चंदीगड येथील डॉ. वंदना नरुला यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
अतिमद्यपानाचा शुक्राणूंवर होतो परिणाम :मद्यपान करणे ही जगभरातील स्त्री पुरुषांची सामान्य सवय झाली आहे. परंतु मद्याच्या अतिसेवनामुळे अनेक दुष्परिणाम होतात. नियमितपणे अतिमद्यपान केल्याने शुक्राणूंवर परिणाम होतो. आठवड्यातून 14 किंवा अधिक वेळा मद्यपान केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. मद्यपान शुक्राणूंची संख्या, आकार, गतिशीलता बदलून प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकते, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
गर्भधारणेचा प्रयत्न करणे विनाशकारी अनुभव :अति मद्यपान करणाऱ्या जोडप्यांनी गर्भधारणेचा प्रयत्न करणे हा एक विनाशकारी अनुभव असू शकतो. एका जोडप्याने अलीकडेच सोशल मीडियावर त्यांची हृदयद्रावक कहाणी शेअर केली आहे. यात त्यांनी अतिमद्यपानामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर कसा परिणाम झाला याबाबत सांगितले आहे. अतिमद्यपानामुळे पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी होती, त्यासह शुक्राणूंची गुणवत्ता खराब होती. वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याला मद्यपान कमी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्याच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.