हैदराबाद :सध्याच्या युगात मोबाईल शिवाय दैनंदिन जीवन अवघड होऊन बसले आहे. ऑफिस ते मार्केटपर्यंतची बहुतांश कामे फक्त स्मार्टफोनद्वारे केली जातात. रात्री झोपतानाही आपण आपला फोन खिशात ठेवतो. मात्र काही तरुण टॉयलेटच्या सीटवर बसून गेम खेळतात. काहीजणांना तर मोबाईलवर व्हिडिओ पाहण्याची सवयच लागते. तेव्हा मर्यादा ओलांडली जाते. मात्र टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याबाबत तुम्हाला माहिती आहे का ? असे करणे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात, याबाबतची माहिती खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.
टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होतो बॅक्टेरियाचा धोका :टॉयलेटमध्ये हानिकारक बॅक्टेरिया असतात. आपण टॉयलेटमध्ये बसून मोबाईल फोन वापरतो, तेव्हा त्याच हाताने जेट स्प्रे, टॉयलेट कव्हर आणि फ्लश बटणाला स्पर्श करतो. मोबाईलला हात लावल्याने मोबाईलच्या स्क्रीनवर अनेक प्रकारचे हानिकारक जंतूचा संसर्ग होतो. तुम्ही तुमचे हात साबणाने स्वच्छ करू शकता, परंतु मोबाईल सहसा निर्जंतूक होत नाही. त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल फोनला पुन्हा स्पर्श करता, तेव्हा जेवणादरम्यान जंतू तुमच्या पोटात पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अपचन आणि संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.