महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

इन्फ्ल्युएन्झाच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष - इन्फ्ल्युएन्झा लसीकरण

दरवर्षी २ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत इन्फ्ल्युएन्झा लसीकरण सप्ताह साजरा केला जातो. इन्फ्ल्युएन्झामुळे नाक, घसा आणि फुफ्फुसांसह श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो. त्यामुळे याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. ईटीव्ही सुखीभवंने याबाबत अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Influenza information
इन्फ्ल्युएन्झा माहिती

By

Published : Dec 5, 2020, 2:06 PM IST

हैदराबाद - आता हिवाळा आला आहे. अनेक प्रकारचे विषाणु आणि बॅक्टेरियांमुळे विविध प्रकारचे संसर्ग पसरण्याचा धोका तयार झाला आहे. त्यातही सर्वाधिक धोका हा इन्फ्ल्युएन्झाचा आहे. इन्फ्ल्युएन्झा हा अशा प्रकारचा विषाणु आहे की जो नाक, घसा आणि फुफ्फुसांसह श्वसन यंत्रणेवर परिणाम करतो. हा संसर्गजन्य आजार असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास, आरोग्य आणखी बिघडते. या विषाणुसाठी लस उपलब्ध असल्याने दरवर्षी २ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत, लसीची उपलब्धता आणि सर्व वयांच्या लोकांचे लसीकरण करण्यासाठी इन्फ्ल्युएन्झा लसीकरण सप्ताह साजरा केला जातो. त्यामुळे संसर्गाला प्रतिबंध करता येईल.

कसा पसरतो इन्फ्ल्युएन्झा?

इन्फ्ल्युएन्झा हा संसर्गजन्य आजार आहे. त्याची सुरूवात खोकला, सर्दी आणि सौम्य तापाने होते, जशी की सामान्य फ्ल्यूमध्ये होते. इन्फ्ल्युएन्झाचा विषाणु आमच्या शरिरात नाक, डोळे आणि तोंडावाटे शिरतो. जेव्हा एखादी संसर्ग झालेली व्यक्ति खोकते किंवा शिंकते, तेव्हा तुषार हवेत उडतात आणि जेव्हा एखादा निरोगी व्यक्ति श्वास आत ओढून घेतो, तेव्हा त्याचा किंवा तिचा विषाणुशी संपर्क येतो. याशिवाय, जेव्हा एखादी निरोगी व्यक्ति संसर्ग झालेल्या व्यक्तिने अगोदर स्पर्ष केलेल्या पृष्ठभागाला किंवा वस्तुला स्पर्श करते, तेव्हाही विषाणुचा प्रसार होऊ शकतो.

तीव्र स्वरूपाच्या इन्फ्ल्युएन्झाचा आरोग्यावर परिणाम

इन्फ्ल्युएन्झाची लागण तीव्र स्वरूपात झालेल्या रूग्णांमध्ये न्यूमोनिया होण्याची दाट शक्यता असते. या संसर्गामुळे नाकपुडी आणि कानांतही संसर्ग होऊ शकतो. जर परिस्थिती गंभीर असेल तर, फुफ्फुसांना सूज येणे आणि द्रवपदार्थाने फुफ्फुसे भरून जाणे अशा समस्याही उद्भवतात. ६५ वर्षाच्या वरच्या व्यक्ति, आरोग्य कर्मचारी, कमी रोगप्रतिकारशक्ति असलेले लोक आणि जुनाट विकारांनी त्रस्त असलेले लोक यांच्यासाठी इतरांच्या तुलनेत इन्फ्ल्युएन्झाचा संसर्ग खूप जास्त प्रमाणात इजा पोहचवतो.

लसीकरण उत्तम

इन्फ्ल्युएन्झाच्या लसीमुळे शरिरात रोगप्रतिकारशक्ति वाढते, सर्दी तसेच हंगामातील नेहमीच्या आजारांपासून संरक्षण करते आणि श्वसनयंत्रणा ही लस मजबूत करते. बहुतेक देशांमध्ये हंगामातील ठराविक आजारांना प्रतिबंध करण्यासाठी वर्षातून एकदा लसीकरणाची शिफारस करण्यात येते.लसीकरण मुले आणि प्रौढ या दोघांसाठीही परिणामकारक आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेही गर्भवती, ६ ते ५९ महिन्यांच्या आतील वयाची मुले, ज्येष्ठ नागरिक, जुनाट विकारांनी ग्रस्त असलेले आणि आरोग्य कर्मचारी अशांसारख्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या लोकांना लसीकरणात प्राधान्य देण्यास देशांना प्रोत्साहन दिले आहे. काही इन्फ्ल्युएन्झाच्या लसी या इंजेक्शनच्या स्वरूपात आहेत तर काही नाकावाटे देण्याच्या स्वरूपात आहेत.

इन्फ्ल्युएन्झाची लक्षणे

• जर तुमचा इन्फ्ल्युएन्झाच्या विषाणुशी संपर्क झाला असेल तर, दिवसभर

थकल्यासारखे वाटत रहाते.

• अशक्तपणा आणि भोवळ आल्यासारखे वाटत रहाते.

• थंडी वाजून येत रहाते आणि भरपूर ताप येतो.

• याशिवाय, घशात कफ वाढतो आणि काहीही गिळायला त्रास होतो.

• श्वासोच्छवास करायला अवघड जाते.

• शिंका येत रहातात.

• डोके आणि स्नायू दुखत रहातात.

कसा करायचा प्रतिबंध

इन्फ्ल्युएन्झाच्या विषाणुला रोखायचे असेल तर स्वच्छता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.म्हणून, आपल्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा तसेच, शौचालयात जाऊन आल्यावर आणि जेवणापूर्वी आणि नंतरही साबणाने हात स्वच्छ धुवा. पचायला हलके तसेच पोषक अन्नाचे सेवन करा, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ति मजबूत होईल. अवजड, शिळे आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांपासून दूर रहा. इन्फ्ल्युएन्झाच्या दरम्यान शरिरात पाण्याचे प्रमाण कमी रहात असल्याने भरपूर पाणी प्या. त्यासह नारळपाणी, ताक, दूध, पाणी आणि फळांचे रसही प्या. लसीकरण करून घ्या. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

ABOUT THE AUTHOR

...view details