डॉ. रंगानायकुलू यांच्या मते, नेहमीच्या तापाप्रमाणे कोव्हिडचा संसर्ग झाल्यानंतरही रुग्णाच्या भूकेवर मोठा परिणाम होतो. या काळात तोंडाची चव गेल्यामुळे रुग्णाला काही खावेसे वाटत नाही. परंतु रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी द्रव स्वरूपात जीवनसत्त्वे आणि खनिजपदार्थ दिले जातात. या काळात साधारणपणे व्हिटॅमिन सी, डी आणि इतरही जीवनसत्त्वयुक्त आहार देण्यावर भर दिला जातो. करोना विषाणूशी लढा देण्यासाठी डॉक्टर रुग्णाला पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देतात. काही नैसर्गिक घटकांमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात त्यातूनही रुग्णाला जीवनसत्व मिळू शकतात. आणि त्याची प्रकृती वेगात सुधारू शकते.
'कोव्हिड-१९' संसर्गानंतर रुग्णाचा आहार
'कोव्हिड -१९' चा संसर्ग झाल्यानंतर संबंधित रुग्णाच्या आहारावर मोठा परिणाम होतो. विशेषतः रुग्णाची भूक कमी होते त्यामुळे त्याच्या द्रव आहारावर भर द्यावा लागतो. याशिवाय रुग्णाला पचायला हलका असा आहार दिला जाणे आवश्यक आहे. खिचडी, चपाती, दुधी भोपळा, दोडक्यासारखी भाजी, तसेच तूर दाळ आणि मूग दाळ (हिरवी) यासारख्या कडधान्याचा रुग्णाच्या आहारात समावेश केला जावा असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला असल्याचेही डॉ. रंगानायकुलू यांनी सांगितले.
रुग्णाच्या तब्येतीनुसार दररोज कोणता आहार घ्यावा यासाठी रुग्णाने आपल्या डॉक्टरांशी अथवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आणि त्याप्रमाणे आपला दैनंदिन आहाराचा तक्ता तयार करावा. या व्यतिरिक्त, रुग्णाने फक्त ताजे शिजविलेले भोजन घ्यावे. शिळे अन्न काटेकोरपणे टाळले पाहिजे. शिवाय कच्चा भाज्या आणि गोड पदार्थ खाणे टाळावे. अनेक रुग्णांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते, परंतु ते मर्यादित स्वरूपात खाल्ले जावेत, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला असल्याचे मत डॉ. रंगानायकुलू यांनी व्यक्त केले.
कोव्हिड (१४ दिवसाचा काळ) बरा झाल्यानंतरचा आहार
कोव्हिड बरा झाल्यानंतरच्या आहाराबाबत बोलताना डॉ. रंगनायकुलू म्हणाले, की रुग्णाचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर, रुग्णाची भूक नेहमीपेक्षा वाढलेली असते. रुग्णाला साधारणपणे आठवडाभर अथवा दहा दिवस खूप भूक लागते. परंतु या काळात रुग्णाने प्रथिनेयुक्त आहारावर भर देणे गरजेचे आहे. कारण हा काळ रुग्णाच्या तब्येतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
फुफ्फुसा आरोग्यासाठी प्रथिनेयुक्त आहार अत्यंत गरजेचा असतो. त्यासाठी शाकाहारी रुग्ण पनीर, अथवा दुधाचे पदार्थ घेऊ शकतात. तसेच, मशरूम, शेंगदाणे आणि सोयाबिन सारख्या पदार्थांचा समावेश शाकाहारी रुग्णाला आपल्या आहारात करता येतो. तर, मांसाहारात अंडी, मांस, चिकन इत्यादी पदार्थांचा समावेश करता येतो. प्रथिनयुक्त आहार फुप्फुसाच्या आरोग्यावर अधिक उपयुक्त असतात. प्रथिनयुक्त आहार नसेल तर उपचार होणे कठीण होते.