टोरंटो : कोरोनामुळे जगभरात अनेक नागरिकांचे बळी गेल्यामुळे कोरोनाची चांगलीच दहशत पसरली आहे. मात्र महिलांपेक्षा कोरोना रुग्ण असलेल्या पुरुषांना मधुमेह होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्यासह रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित पुरुषांना इतर नागरिकांच्या तुलनेत मधुमेहाचा धोका दुप्पट असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. जगभरातील 20 पैकी एका जणाला मधुमेहाने ग्रासल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनामुळे वाढतो मधुमेहाचा धोका :कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या पुरुषांना मधुमेहाचा धोका इतर नागरिकांच्या तुलनेत दुपटीने असल्याचा दावा ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या संशोधकांनी केलेले हे संशोधन जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनात तब्बल 3 ते 5 टक्के नागरिकांना कोविडमुळे मधुमेहाची सुरुवात झाल्याचे आढळून आल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. SARS CoV 2 संसर्ग मधुमेहाशी संबंधित आहे. कोरोनाचे संक्रमण मधुमेहाचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरतात. कोविड-19 संसर्ग पोस्टअॅक्युट टप्प्यात रक्तातील ग्लुकोजचे नियमन करणाऱ्या अवयव प्रणालींशी संबंधित असल्याचा दावा ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधक नावेद जांजुआ यांनी केला आहे.