हैदराबाद : उन्हाळा आल्यानंतर उकाड्याने नागरिक हैराण होतात. त्यामुळे प्रकृतीला उकाड्यापासून जपण्यासाठी विविध उपाय करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात घरातही मोठ्या प्रमाणात उकाड्याचा त्रास होत असल्याने नागरिकांना घर थंड राहण्यासाठी छतावर धाबे टाकावे लागतात. मात्र तेलंगाणा राज्याने सोमवारी कूल रूफ पॉलिसी लाँच केली आहे. उर्जेचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने पुढाकार घेणारे तेलंगाणा हे देशातील पहिले राज्य बनले आहे. नगरविकास मंत्री केटी रामा राव यांनी सोमवारी कूल रूफ पॉलिसी लाँच केली आहे.
पर्यावरणपूरक राज्य बनण्याचे आहे ध्येय :तेलंगाणाने कूल रूफ पॉलिसी धोरण 2023 ते 2028 पर्यंत स्वीकारल्याची माहिती तेलंगाणाचे मंत्री के टी रामा राव यांनी दिली. तीव्र उष्णतेपासून सुटका निर्माण होण्यासाठी उपाय म्हणून थंड छप्परांचा अवलंब करण्याचे धोरण स्वीकारल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कूलिंगसाठी ऊर्जेच्या वापरावर कमी अवलंबित्व असलेले पर्यावरणपूरक राज्य बनण्याचे आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्व सरकारी, सरकारी मालकीच्या, व्यावसायिक इमारतींसाठी आता कूल रूफिंग अनिवार्य आहे. पॉलिसीचे पालन केल्याची खात्री केल्यानंतरच भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचेही मंत्री के टी रामा राव यांनी यावेळी स्पष्ट केले.
कूल रुफ पॉलिसी या घरांसाठी आहे बंधनकारक :तेलंगाणा सरकारने लागू केलेल्या कूल रुफ पॉलिसी अत्यंत फायदेशीर असल्याचे दिसून येते. सरकारने 600 चौरस यार्ड आणि त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या निवासी इमारतींसाठी ही पॉलिसी अनिवार्य केली आहे. मात्र 600 चौरस यार्डपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या इमारतींसाठी ते ऐच्छिक आहे. मंत्री रामा राव यांनी आपल्या घरालाही या पॉलिसीनुसार काम करुन घेतले आहे. ते खूप फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिक आणि मालमत्ता मालकांना कूल रूफ पॉलिसी स्वीकारण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या टाइल्सची किंमत प्रति चौरस मीटर 300 रुपये असणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या पॉलिसीच्या अंमलबजावणीसाठी पुरवठादार, प्रशिक्षित मनुष्यबळ, चाचणी आणि सामग्रीची परिसंस्था विकसित करणे हे धोरणाचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय आहे कूल रुफ पॉलिसी :कूल रुफ पॉलिसीने बांधकाम करण्यात आलेल्या घराच्या छताला नेहमीच्या छतापेक्षा सूर्यापासून कमी उष्णता लागते. हे छत सूर्यप्रकाश परावर्तित करून थर्मल रेडिएशन उत्सर्जित करतात. सूर्यप्रकाशात तुलनेने थंड राहत असल्याने सौर शोषण कमी होते. यामुळे घरातील तापमान 2.1 ते 4.3 अंश कमी ठेवण्यास मदत होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यासह उर्जेच्या खर्चात 20 टक्के बचत करू शकत असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. कूल रूफ पॉलिसी अंतर्गत तेलंगाणाने 2023 ते 2024 मध्ये हैदराबाद शहरासाठी ५ चौरस किमी क्षेत्राचे आणि उर्वरित राज्यासाठी 2.5 चौरस किमीचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2028-29 पर्यंत हैदराबादमध्ये 200 चौरस किमी आणि उर्वरित राज्यात 100 चौरस किमीपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ही पॉलिसी प्रतिवर्षी 600 दशलक्ष युनिट ऊर्जा वाचवण्यास मदत करेल अशी अपेक्षा मंत्री के टी रामा राव यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Coconut Water Benefits : उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर