हैदराबाद - बालपणात होणाऱ्या एचएलएच (हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस) या जीवघेण्या आजारावरील औषधाचा अभ्यास करण्यासाठी सिनसिनाटी चिल्ड्रन्स या लहान मुलांच्या रुग्णालयात एक ट्रान्सजेनिक अर्थात् जनुकीयदृष्ट्या संशोधित उंदीर विकसित करण्यात आला आहे. कोविड-19 विषाणूच्या महामारीत लोकांचे प्राण वाचविण्यात ही घडामोड महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते.
एचएलएच आजारावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची (रुक्सॉलिटिनीब) एक लहान क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. याअंतर्गत, कोविड-19 ने गंभीरदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांमधील श्वसनसंबंधी व शरीरातील इतर अवयवांमध्ये होणारे प्रज्वलन (दाहकता) नाट्यमय रीतीने कमी करण्यात यश मिळाले आहे. जनुकीय तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित करण्यात आलेल्या उंदरांच्या प्रजातीचे संशोधक असलेल्या सिनसिनाटी चिल्ड्रन्स येथील कर्करोगाचे रोगनिदानतज्ज्ञ गँग हुआंग हे या चाचणीत सहकारी अन्वेषकाची (को-इन्व्हेस्टिगेटर) भूमिका पार पाडत आहेत. दुसऱ्या टप्प्यात झालेल्या क्लिनिकल अभ्यासासंदर्भातील माहिती ही जर्नल ऑफ एलर्जी अँड क्लिनिकल इम्युनॉलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अभ्यासात वुहान, चीन येथे 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीदरम्यान गंभीर स्वरुपातील कोविड-19 चे निदान होऊन रुग्णालयात दाखल झालेल्या 43 रुग्णांचा समावेश करण्यात आला. महामारीची सुरुवात वुहानपासून झाल्याचे मानले जाते. वुहान येथील टाँगजी रुग्णालयातील हेमॅटॉलॉजी विभागाचे जिआनफेंग झोऊ, एमडी, पीएचडी, टाँगजी मेडिकल कॉलेज आणि हुआझोंग विज्ञान विद्यापीठ यांच्या नेतृत्वाखाली हा बहुकेंद्रीय अभ्यास पार पडला.
कर्करोग आणि रक्तविषयक आजार संस्थेचा भाग असलेल्या सिनसिनाटी चिल्ड्रन्स एचएलएच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे कार्यरत असणारे श्री हुआंग आणि इतर सहकाऱ्यांबरोबर श्री झोऊ हे अनेक काळापासून काम करीत आहेत.
रुक्सॉलिटिनीबची चिन्हे सकारात्मक..
रुक्सॉलिटिनीब घेणाऱ्या काही रुग्णांची निवड करण्यात आली. त्यांना दररोज 5 मिलीग्रॅम हे दाहकता कमी करणारे औषध देण्यात आले. याशिवाय, त्यांना कोविड-19 साठी देण्यात येणारे नियोजित (स्टँडर्ड ऑफ केअर) उपचार देण्यात आले. त्यानंतर, 21 रुग्णांच्या दुसऱ्या नियंत्रण गटाला प्लॅसिबो आणि नियोजित उपचार देण्यात आले. “रुक्सॉलिटिनीब घेणाऱ्या रुग्णांमध्ये अधिक वेगवान सुधारणा दिसून आली”, असे अभ्यासकांनी आपल्या अहवालात लिहीले आहे.
“रुक्सॉलिटिनीब गटातील रुग्णांमध्ये छातीच्या सीटी चाचणीत लक्षणीय सुधारणा, लिम्फोपेनियातून जलद बरे होणे आणि अनुकूल परिणाम दिसून आले. या गोष्टी भविष्यात अधिक मोठ्या लोकसंख्येवर रुक्सॉलिटिनीबची कार्यक्षमता तपासण्यासाठी माहितीपूर्ण आणि प्रोत्साहनपर ठरल्या.”
रुक्सॉलिटिनीबचे उपचार करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सुधारणा घडून येण्यासाठी लागलेला कालावधी नियंत्रण गटातील रुग्णांच्या तुलनेत कमी होता. संशोधकांना असे आढळून आले की, 90 टक्के रुक्सॉलिटिनीब रुग्णांच्या सीटी स्कॅनमध्ये 14 दिवसांत सुधारणा दिसून आली. नियंत्रण गटातील रुग्णांमध्ये हे प्रमाण 9 टक्के होते. श्वसन यंत्रणेत बिघाड झाल्याने नियंत्रण गटातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, रुक्सॉलिटिनीब देण्यात आलेले सर्व गंभीर आजारी रुग्ण जिवंत राहिले.
या औषधाची पुढे क्लिनिकल चाचणी आवश्यक आहे. तिसऱ्या टप्प्यातील रुक्सकोव्हिड ही अधिक मोठ्या प्रमाणावर होणारी क्लिनिकल चाचणी इनसाईट आणि नोव्हार्टिस यांच्यातर्फे केली जात आहे. याअंतर्गत, कोविड-19 ने गंभीरदृष्ट्या आजारी असलेल्या 400 रुग्णांना हे औषध दिले जाणार आहे, अशी माहिती हुआंग यांनी दिली. अभ्यासातील प्राथमिक निरीक्षणे उन्हाळ्यात प्रसिद्ध होतील अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.