वॉशिंग्टन :मुलांना जर समान वंशाच्या शिक्षकांनी शिकवले तर त्यांच्यात अडचणी सोडवण्याची कौशल्य विकसित होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या मुलांमध्ये वयाच्या सातव्या वर्षी उच्च शिक्षण आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये असतात. कृष्णवर्णीय आणि लॅटिनक्स मुलांमध्ये याचा परिणाम सर्वात जास्त दिसून आल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. या संशोधकांनी अमेरिकेतील तब्बल 18 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर संशोधन केले आहे.
समानतेला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल :मुलांची वांशिकता त्यांच्या शिक्षकांसोबत जोडली गेली, तर मुलांची कार्य करण्याची क्षमता अधिक असते. त्यासह मुलांची स्मृती चांगली विकसित होण्याची शक्यता असते. कौशल्य शिकण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांचे वांशिक गुण जुळणे आवश्यक असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये विविधता आणणे हे शाळांमध्ये अधिक समानतेला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक मायकेल गॉटफ्राइड यांनी व्यक्त केले. याबाबतचे संशोधन अर्ली एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.