हैदराबाद :देशभरात आज दुर्गाष्टमी साजरी करण्यात येत आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा देवीच्या ९ रुपापैकी आठवे रुप असलेल्या महागौरी मातेची पूजा करण्यात येते. महागौरीला 'श्वेतांबरधारा' असेही म्हणतात. महागौरी मातेचे सर्व दागिने आणि कपडे पांढरे असून महागौरी हे नाव मातेच्या पूर्ण गौर वर्णाचे प्रतिनिधित्व करते. माता महागौरी नावाची तुलना तिच्या गोऱ्या रंगामुळे शंख, चंद्र आणि कुंद फुलाशी करण्यात येते.
काय आहे महागौरी मातेच्या इतिहास :तारकासुर नावाच्या राक्षसाने देवतांना त्रास दिला होता. त्यामुळे सगळे देव हतबल झाले होते. केवळ शिवपुत्र तारकासुराला मारू शकत होता. त्यामुळे देवांच्या आज्ञेनुसार देवी सतीने भगवान शिवाशी लग्न करण्यासाठी हिमालयाची कन्या शैलपुत्री म्हणून पुनर्जन्म घेतल्याची अख्यायिका आहे. माता शैलपुत्रीने तिचे स्वरूप प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे मातेचे शरीर काळे झाले. देवीच्या तपश्चर्येने भगवान महादेव प्रकट होऊन त्यांनी मातेचा स्वीकार केला. त्यानंतर महादेवांनी मातेला गंगेच्या पाण्यात स्नान करण्यास सांगितले. त्यामुळे माता पांढर्या प्रकाशासारखी अत्यंत तेजस्वी झाली. त्यामुळे मातेला 'गौरी' असे नाव पडले. देवी महागौरीला अन्नपूर्णा, ऐश्वर्या या नावानेही ओळखले जाते.
- कसा आहे महागौरी मातेचा अवतार : माता महागौरीचे रुप अगदी गौरवर्ण आहे. महागौरी मातेची आभा अगदी दृश्यमान आहे. ही भव्यता शंख, चंद्रासारखी मानली जाते. मातेचे सर्व कपडे आणि दागिने पांढरे आहेत. महागौरीला चार हात असून मातेचे वाहन वृषभ आहे. माता शांत मुद्रेत असल्याचे दिसून येते.