हैदराबाद - संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात कार्यरत सेलट्रियन कंपनीने 'मर्स' (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) कोरोना विषाणूवरील अँटीबॉडी विकसित करण्यात यश मिळविले आहे. सेलट्रियन ही दक्षिण कोरियाची जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत कंपनी आहे.
मर्सचे निराकरण करण्यासाठी उपचार आणि तंत्रज्ञान विकसित करण्याला प्रोत्साहित करणे हे या राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. सेलट्रियनने मर्सवरील CT-P38 या अँटीबॉडीच्या विकासात गती आणली. यासाठी या प्रकल्पाला 3.7 अब्ज कोरियन होन इतका खर्च आला, ज्यात सरकारकडून 2.2 अब्ज होनची मदत मिळाली. पुढच्या टप्प्यात या अँटीबॉडीच्या नॉन-क्लिनिकल चाचण्या आणि पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्याच्या उद्दिष्टाने या वर्षापासून 2022 पर्यंत कोरिया विद्यापीठाशी सहकार्य करार करण्याची सेलट्रियनची योजना आहे.
2018 मध्ये सेलट्रियनने मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस संबंधित रेणूविषयी देशी आणि विदेशी पेटंट्सचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर, त्याच वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएंझा आणि इतर श्वसन रोग असोसिएशनने (आयएसआयआरव्ही) प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात, मर्सवर उपचार करण्यासाठी इतर बहुराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी विकसित केलेल्या अँटीबॉडीजच्या तुलनेत CT-P38 सर्वात प्रभावी असल्याचे म्हटले होते.