७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा होत असतो.यावर्षी 'चांगले,आरोग्यदायी जग तयार करणे' हे सगळ्यांचे उद्दिष्ट असेल.जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ )असे म्हटले आहे की,या जागतिक आरोग्य दिनी,आम्ही आरोग्यासाठी असमानता दूर करण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी करीत आहोत.गेले वर्षभर एक मोहीम राबवली जात आहे.त्यात चांगले आणि आरोग्यदायी जग निर्माण करण्यासाठी लोकांना एकत्र आणले जात आहे.ही मोहीम जागतिक आरोग्य संघटनेच्या मूलभूत तत्त्वांना अधोरेखित करते.ती म्हणजे, 'वंश,धर्म,राजकीय मते,आर्थिक किंवा सामाजिक स्थिती काहीही असली तरी सर्वांना चांगल्या आरोग्याचा आनंद मिळालाच पाहिजे.'
थोडक्यात इतिहास
डिसेंबर १९४५ मध्ये ब्राझील आणि चीनने सर्वसमावेशक व स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना स्थापण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर जुलै १९४६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला आणि ७ एप्रिल १९४८ रोजी ६१ देशांनी एकत्र येऊन या एनजीओच्या स्थापनेच्या करारावर स्वाक्षरी केली.
हा दिवस प्रथम १९४९ मध्ये २२ जुलै रोजी पाळला गेला. परंतु त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची अधिकृत स्थापना झाली, त्याच तारखेला म्हणजे ७ एप्रिल रोजी हा दिवस ठरवला गेला. म्हणूनच, १९५० मध्ये प्रथमच हा दिवस अधिकृतपणे साजरा झाला.
'जागतिक आरोग्य दिनाचे उद्दिष्ट म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या ( डब्ल्यूएचओ ) प्राथमिकतेच्या क्षेत्रावर प्रकाश टाकण्यासाठी विशिष्ट आरोग्य विषयाबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे हे आहे.' असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची नवीन आकडेवारी
पहिल्यांदा २० वर्षांमध्ये जागतिक दारिद्र पातळीत वाढ झाल्याचे भाकित आणि शाश्वत विकास ध्येयांकडे जाणाऱ्या प्रगतीत अडथळा येण्याचा अंदाज आहे.
काही देशांमध्ये राहणाऱ्या ६० टक्के लोकांकडे अत्यावश्यक आरोग्य सेवांचा समावेश नाही.
वस्त्यांमध्ये किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या १ अब्जाहून अधिक लोकांना संसर्ग आणि कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
जागतिक आरोग्य दिन आणि कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ
देश आजही कोविड-१९ महामारीचा सामना करतच आहे. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने 'ईटीव्ही भारत सुखीभव'च्या टीमने काही डॉक्टरांशी भारतात या नव्या कोविड रूपाबद्दल आणि वाढणाऱ्या रुग्ण संख्येबद्दल संवाद साधला.
इंदोरच्या अॅपल रुग्णालयाचे डॉ. संजय के जैन, एमबीबीएस, एमडी ( मेडिसिन ) यांनी कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेबद्दल सांगितले. ते म्हणाले, कोविड-१९ हा संसर्गजन्य आहे. त्यामुळे हा विषाणू नेहमीच आपले रूप बदलत असतो. या कोरोना विषाणूची रचना बदलत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हा विषाणू आपले रूप बदलतो आहे. त्याबरोबर संसर्गाचा मार्गही बदलत आहे. म्हणूनच हा विषाणू जलद गतीने पसरत आहे. म्हणूनच, हा विषाणू वेगवान दराने संक्रमित होत आहे आणि लोकांना शरीरावर वेदना, घसा खवखवणे, सर्दी आणि कोरडा खोकला यासह गंभीर लक्षणे दिसत आहेत. त्याशिवाय टेस्ट केल्यानंतर पाॅझिटिव्ह रिपोर्ट येऊनही अनेकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. हे जास्त धोकादायक आहे. कारण त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले नाही तर ते कोरोना विषाणू पसरवणार. त्यामुळे तातडीने रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे. ते म्हणाले, तुलनेने मृत्यू दर खूपच कमी आहे. कारण लोकांची टेस्ट केली जाते आणि त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातात.
वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. हेम जोशी यांनीही या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते स्पष्ट करतात की, अल्पवयीन लोकांना अजूनही जास्त धोका आहे. ज्यांच्या संपूर्ण कुटुंबात विषाणूची लागण झाली आहे, अशा रूग्णांची संख्या वाढली आहे. तथापि जर एखाद्या संक्रमित व्यक्तीची स्थिती गंभीर नसेल तर केवळ घरीच अलग ठेवून, नियमितपणे डॉक्टरांनी लिहून घेतलेली औषधे आणि सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास ते स्वत:ला बरे करू शकतात आणि इतरांना संसर्ग होण्यापासून रोखू शकतात.
याबद्दल बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली नवले पुरंदरे सांगतात, कोविड-१९ च्या सुरुवातीच्या काळात लहान मुलांना कोविड होत नाही असा समज होता. कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते. पण देशात सुरू असलेल्या या नव्या लाटेने हे समोर आणले आहे की, मुलांनाही कोरोना होत आहे. त्यांनी सांगितले की विषाणूच्या या नव्या रूपाचा संसर्ग लहान मुलांमध्ये सर्व वयोगटात होत आहे. अगदी २ – ३ महिन्यांच्या बाळालाही होत आहे. यांची लक्षणेही सारखीच आहेत. म्हणजे खोकला, सर्दी आणि ताप.
त्याचबरोबर, दुसऱ्या बालरोग तज्ज्ञ डॉ. लतिका जोशी म्हणतात की, मुलांमध्ये लक्षणे दिसली नाही, तरी ते विषाणूचे वाहक असू शकतात. त्यामुळे कुटुंबात संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच आपल्या मुलास सौम्य लक्षणे दिसत असली तर त्वरित तपासणी करून वैद्यकीय सल्ला घ्या.
कोरोना विषाणूच्या या नव्या लाटेत मानसिक आरोग्याबद्दल बोलताना डेहराडूनच्या वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वीणा कृष्णन सांगतात, या काळात लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाले आहेत. सुरुवातीला या वर्षात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत होती आणि लसीकरण सुरू झाले होते, तेव्हा आता सर्व काही नियमित होईल, अशी आशा लोकांना वाटत होती. पण अचानक देशभर रुग्ण वाढू लागले. आता गेल्या वेळेपेक्षा लोकांमध्ये जास्त अस्वस्थता आणि नैराश्य आहे. लोकांना असहाय्य आणि दुर्दैवी वाटत आहे. मानसिक स्थिती बिघडलेले लोक फारसे आढळून येत नसले तरी, अस्वस्थता वाढली आहे. आपण असे म्हणू शकतो की पुन्हा एकदा हा आजार बळावला आहे.
म्हणूनच, कोविड-१९ चे हे नवे रूप जास्त प्रमाणात लोकांवर परिणाम करत असले तरी एक लक्षात असू द्या, कुठल्याही किंमतीत आरोग्याशी तडजोड करू नका. आरोग्यदायी आणि पौष्टिक आहार घ्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा, जेणेकरून आपल्या शरीरावर विषाणूचा तीव्र परिणाम होणार नाही. याशिवाय आपले मानसिक आरोग्यही राखणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावरच्या खोट्या फॉरवर्डचे तथ्य शोधा आणि आपण काय वाचावे ते काळजीपूर्वक निवडा. जास्त बातम्या वाचू नका. यामुळे तुमच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच लसीबद्दल खोटी माहिती घेऊन स्वत:ची दिशाभूल करू नका. लस सुरक्षित आहे आणि लस घेतल्यावर कोरोना झालाच, तर त्याची तीव्रता कमी असेल आणि इतर आरोग्याच्या गुंतागुंतीही होणार नाहीत.
कोविड-१९ ने जगावरच हल्ला केला आहे. पण त्याचा जास्त परिणाम हा दुर्लक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजावर झाला आहे. या समाजाला वेळेवर वैद्यकीय सेवा मिळत नाही. म्हणूनच आजच्या दिवसाची संकल्पना अशी की, आम्ही एकत्रितपणे आरोग्य विषमता रोखण्याचे कार्य केले पाहिजे. लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करून, प्रत्येक गरजूसाठी योग्य आणि वेळेवर आरोग्य सेवा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.