हैदराबाद :भगवान गौतम बुद्ध यांनी अखिल विश्वाला शांतीचा संदेश दिला. त्यामुळे गौतम बुद्ध यांच्या विचाराची गरज आज जगाला असल्याचे मत विविध तज्ज्ञ व्यक्त करतात. गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला आहे. त्यामुळे जगभरात गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी बुद्ध पौर्णिमेला अनोखा योगायोग येत आहे. त्यामुळे नेमका काय आहे हा योगायोग याविषयीची माहिती आपण जाणून घेऊ.
काय आहे गौतम बुद्ध यांचा इतिहास :गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी इसपू 563 मध्ये राजा शुद्धोधन आणि महामाया यांच्या पोटी झाला. राजकुलीन असलेल्या गौतम बुद्ध यांनी सगळे राज्य सोडून ध्यान करण्यासाठी आपले जीवन व्यथीत केले. गौतम बुद्ध यांनी बौद्धगया येथील बोधी वृक्षाखाली घोर तपस्या केल्यामुळे त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यानुसार गौतम बुद्ध यांनी आपल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनेक अनुयायी झाले. त्यामुळे गौतम बुद्ध यांची किर्ती सर्वदूर पसरली.
वैशाख पौर्णिमेचे महत्व :गौतम बुद्ध हे हिंदू धर्मात जन्मल्याने त्यांना हिंदू धर्मीय त्यांना भगवान विष्णूचा 9 वा अवतार मानतात. त्यामुळे वैशाख पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त होते. गौतम बुद्ध यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच बौद्धगया येथील बोधी वृक्षाखाली दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याने या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय फार महत्वाची असल्याचे मानतात. तर प्रत्येक पौर्णिमेला जगाचे तारणहार असलेल्या भगवान विष्णूची पूजा हिंदू धर्मीय करतात. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही धर्माचे नागरिक वैशाख पौर्णिमेला मोठ्या भक्तीभावाने साजरी करतात.