हैदराबाद : आज जगातील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. याची स्थापना 1980 मध्ये करण्यात आली होती. आजच्या घडीला भाजपची सदस्यांची संख्या १८ कोटींहून अधिक आहे. गेल्या नऊ वर्षात पक्षाने 12 कोटींहून अधिक लोकांना आपले सदस्य बनवले आहे. त्यामुळे भाजप सध्या सगळ्यात मोठा पक्ष असून आज भाजपचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
चीनची कम्युनिस्ट पार्टी आहे दुसऱ्या क्रमांकावर :भाजप जगातला सगळ्यात मोठा असून दुसऱ्या क्रमांकावर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची वर्णी लागल्याचे दिसून येते. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची सदस्य संख्या नऊ कोटी आहे. त्यामुळे चीनी कम्युनिस्ट पार्टीची सदस्यसंख्या भाजपच्या सदस्यसंख्येच्या अर्धी आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षालाच सीसीपी असे म्हणतात.
अमेरिकेची डेमोक्रॅटिक पार्टी आहे तिसऱ्या स्थानांवर :डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अमेरिकेची स्थापना १८२८ मध्ये करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाचे 4.80 कोटी सदस्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जो बायडन या पक्षाचे सदस्य आहेत. या तिघांनाही राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. त्यांच्यासह रुझवेल्ट, जॉन केनेडी आणि जिमी कार्टर हे देखील डेमोक्रॅट पक्षाचे सदस्य होते.
रिपब्लिकन पक्ष: अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा रिपब्लिकन पक्ष हा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. या पक्षाची सदस्य संख्या 3 कोटी 57 लाख असल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात येतो. रिपब्लिकन पक्षाची स्थापना 1854 मध्ये करण्यात आली आहे. अब्राहम लिंकन, निक्सन, रेगन, जॉर्ज बुश, डोनाल्ड ट्रम्प आदी नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व केले आहे.
काँग्रेस : काँग्रेस हा जगातील पाचव्या क्रमांकाचा पक्ष मानला जातो. काँग्रेसची सदस्य संख्या १.८० कोटी आहे. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये अलेन ओक्टेवियन ह्यूम यांनी केली होती. सध्या मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत.