हैदराबाद :धकाधकीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अपचनाचा त्रास वाढला आहे. त्यामुळे आजकाल सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये अँटासिड म्हणजेच अॅसिडिटीविरोधी औषध वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अँटासिड या औषधाचे आरोग्यावर घातक परिणाम होत नाहीत, परंतु त्याचा अतिवापर आरोग्यावर विपरीत परिणाम करु शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
का होते अॅसिडिटी :पोटात गॅस, अॅसिडीटी किंवा अपचन यांच्यासारख्या समस्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. डॉक्टरांच्या मतानुसार प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला पोटात अॅसिडिटीचा त्रास होणे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी अँटासिड घेणे सामान्य आहे. मसालेदार अन्न खाल्ल्याने, पचायला वेळ लागणारे अन्न खाल्ल्याने, कोणत्याही अन्नाची अॅलर्जी किंवा कोणत्याही रोगाचा किंवा औषधाचा साईड इफेक्ट अशा अनेक कारणांमुळे पोटात गॅससह अॅसिडिटी होऊ शकते असा दावा संशोधक करतात. अँटासिड्स आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचा समज नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे ते विकत घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. परंतु बऱ्याच नागरिकांना अँटासिड्सचा दीर्घकाळ वापर करणे आरोग्यावर विपरित परिणाम करु शकतात हे माहित नाही.
काय आहे अँटासिड आणि त्याचे कार्य :आपला आहार पचवण्यासाठी आपल्या पचनसंस्थेत विशिष्ट प्रकारचे रस, एन्झाइम्स आणि अॅसिड तयार होतात. ते अन्न पचवून आहारातून पोषण शोषून घेतात. जर आम्ल शरीरात सामान्य स्थितीत आणि आवश्यक प्रमाणात तयार होत असेल तर बहुतेक प्रकरणांमध्ये गॅस अॅसिडिटी सारखी समस्या उद्भवत नाही. परंतु काही वेळा भरपूर आहार घेतल्याने, अवेळी खाल्ल्याने, रोग किंवा औषधाच्या प्रभावामुळे किंवा इतर कारणांमुळे, पचनसंस्थेमध्ये अॅसिडचे उत्पादन वाढू लागते. अशा स्थितीत व्यक्तीला छातीत दुखणे, पोटात जळजळ होणे, पोटात गॅस होणे, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे किंवा अपचन यांसारखी समस्या होते. ही एक अतिशय सामान्य गोष्ट असून सहसा अधूनमधून उद्भवणार्या अशा प्रकारच्या समस्यांमध्ये वैद्यकीय सल्ल्याशिवाय देखील अँटासिड्स घेतले जाऊ शकत असल्याचे मुंबईतील आहारतज्ञ रुशेल जॉर्ज यांनी सांगितले आहे.
पोटात अॅसिडचे होते जास्त उत्पादन :मात्र पोटात अॅसिडचे जास्त उत्पादन होत असेल तर त्यामुळे पचनसंस्थेलाही हानी पोहोचते. यामुळे पोटात सूज आणि गॅस्ट्रोसह अन्ननलिका समस्या, पोटात अल्सर, जठराची सूज, पोट फुगणे, छातीत जळजळ, अॅसिड रिफ्लक्स, जीईआरडी किंवा पेप्टिक अल्सर आणि अपचन होऊ शकते. यामध्ये डॉक्टर लक्षणे कमी करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी अँटासिड्स लिहून देतात. वास्तविक अँटासिड पोटातील अॅसिडचा प्रभाव कमी किंवा निष्क्रिय करण्याचे काम करते. अँटासिड्स बाजारात जेल, सिरप, गोळ्या फळांचे क्षार आणि पावडरच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. अॅलोपॅथिक औषधांच्या श्रेणीत येणारे अँटासिड्स मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, कॅल्शियम आणि सोडियम बायकार्बोनेट आणि इतर काही क्षार आणि घटकांच्या मिश्रणातून तयार केले जातात. ते आम्ल विरुद्ध पचनसंस्थेतील पीएच pH पातळी तटस्थ करण्यात मदत करतात.