हैदराबाद : पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान पुण्यातील आनंदी गोपाळ जोशी यांना मिळाला आहे. मात्र आनंदी गोपाळ जोशी यांचा डॉक्टर होण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा वयाने 20 वर्षे मोठ्या असलेल्या गोपाळ जोशी यांच्यासोबत झाला होता. आनंदीबाईंना वयाच्या 14 व्या वर्षीच मूल झाले. मात्र 10 दिवसाचे मूल उपचाराअभावी दगावल्याने त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांच्या डॉक्टर होण्याची ही खडतर कहाणी अनेकांना प्रेरणादायी अशीच आहे.
कोण होत्या आनंदी गोपाळ जोशी :कल्याण परिसरातील गणपत अमृतेश्वर जोशी हे आनंदीबाईंचे वडील होते. त्यांचे लग्नाच्या अगोदरचे नाव यमुनाबाई असे होते. आनंदीबाई यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोपाळ जोशी यांच्याशी झाल्याने त्यांच्या आयुष्याने मोठी कलाटणी घेतली. गोपाळ जोशी हे पोस्टात नोकरीला होते. आनंदीबाईंने वयाच्या 14 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. मात्र बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे आनंदीबाई यांचे बाळ 10 व्या दिवशीच दगावले. बाळ दगावल्याचा जोरदार धक्का आनंदीबाईंना बसला. त्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले.
असा सुरू झाला खडतर प्रवास : गोपाळ जोशी यांनी आनंदीबाईंना डॉक्टर करण्यासाठी मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे गोपाळ जोशी यांची अगोदर अलिबाग येथे बदली झाली. मात्र तेथेही आनंदीबाईंना शाळेत प्रवेश न मिळाल्याने गोपाळ जोशी यांनी तत्कालिन कलकत्ता येथे बदली करुन घेतली. कलकत्ता येथे बदली झाल्यानंतर आनंदीबाई इंग्लिश आणि संस्कृत लिहणे, वाचणे शिकू लागल्या. गोपाळ जोशी यांनी लोकहितवादी यांची शतपत्रे वाचल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला उच्च शिक्षण देण्याचे ठरवले.