यवतमाळ - कोणतेही काम मार्गी लागत नसल्याने आता ऑफलाइन सभेची मागणी केली जात आहे. बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा घाट सत्ताधार्यांनी घातला आहे. सभेची नोटीसही अनेकांना मिळाली नाही. प्रोसिडींगची मागणी करुनही दिली गेली नाही, असे आरोप करत संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य श्याम जयस्वाल आणि निमिष मानकर यांनी गुरुवारी (दि. 2 सप्टेंबर) सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुदधे यांची खुर्ची कक्षाबाहेर काढून संताप व्यक्त केला.
अनेकांना मिळाली नाही नोटीस
ऑफलाइन सभा घेण्याच्या संदर्भात सत्ताधारी पदाधिकारी व विरोधी पक्षातील सदस्यांनी 27 ऑगस्टला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. त्यात त्यांनी ऑफलाइन सभा घेता येणार नाही, त्याबाबत कुठलेही निर्देश नसल्याचे सांगितले. मात्र, 90 लोकांना सभागृहात बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकार्यांच्या पत्राची कुठलिही प्रतीक्षा न करता सत्ताधार्यांनी सभेची नोटीस काढून ऑनलाइन सभा घेण्याचा घाट घातला. त्यातही सभा सहा दिवसांवर आली असताना अनेक सदस्यांना गुरुवार (दि. 2)पर्यंत नोटीस मिळाली नाही.