यवतमाळ: केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याची आज बाभुळगाव शहरात युवक कॉंग्रेसच्या वतीने अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बाभूळगाव तहसील कार्यालयात ही अंत्ययात्रा आणून विधिवत या विधेयकाच्या प्रतिकात्मक शवाला अग्नी देण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तहसीलदार यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
कृषी विधेयकाची युवक काँग्रेसने काढली अंत्ययात्रा शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करीत शहरातून काढलेल्या या प्रेतयात्रेत शेतकरी पुत्रांना सहभागी करून घेण्यात आले. कृषी कायदे पारित करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही, हे कायदे शेतकऱ्यांच्या दृष्टीने मारक आहेत. त्यामुळे सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावे म्हणून या कायद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा घेऊन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट बाभूळगाव तहसील कार्यालयात प्रवेश करून केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर कायद्याचे दहन करण्यात आले.
दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन
कृषी विधेयकाची युवक काँग्रेसने काढली अंत्ययात्रा कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी दिल्लीमध्ये मागील १२ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला समर्थनासाठी जिल्ह्यात भरात विविध ठिकाणी आंदोलने, निवेदने, मोर्चे काढण्यात येत आहे. आज बाभूळगाव येथे कृषी कायद्याची अंत्ययात्रा काढून हे विधेयक रद्द करण्यात यावे तसेच दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून हे आंदोलन करण्यात आले.