यवतमाळ -राळेगाव, पांढरकवडा परिसरामध्ये १३ जणांचे बळी घेणाऱ्या टी वन वाघिणीला 2 नोव्हेंबरला मध्यरात्री ठार करण्यात आले. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने शूटर असगर अली आणि नवाब शाफत अली खान यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
नवाब पिता-पुत्रांनी परिसरात ठाण मांडून गरिबांचे जीव वाचविले. मात्र, वन विभागाने त्यांना दुर्लक्षित ठेवले. त्यामुळे टी-वन वाघिणीला ठार मारण्याच्या वर्षपूर्तीला नवाब पिता-पुत्र आणि त्यांच्या पथकाचा सत्कार ग्रामस्थांनी केला. सरकारने सहाय्य केले नसल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून 21 हजार रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द केला. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
'टी-वन' वाघीण ठार घटनेची वर्षपूर्ती; नवाब पिता-पुत्रांचा ग्रामस्थांकडून सत्कार वाघिणीला ठार मारण्याची वर्षपूर्ती झाली. या कालावधीपासून परिसरामध्ये एकही जीवितहानी झालेली नाही. याचाच अर्थ टी-वन वाघिणीच्या हल्ल्यांमध्येच गरीब शेतकरी, शेतमजुरांचे बळी गेले हे सिद्ध होत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नरभक्षक टी वन वाघिणीला ठार मारल्याने देशभर वादंग झाला. शूटर नवाब पितापुत्रांवर टीकेची झोड उठली होती. मात्र, यवतमाळच्या ज्या गावांमध्ये वाघिणीची दहशत होती, त्या ग्रामस्थांनी शूटर नवाब पिता-पुत्र आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. 'कधीही गावात न आलेल्या तथाकथित प्राणीमित्र आणि राजकीय पक्षाच्या महानगरातील पुढाऱ्यांनी वनविभाग आणि शूटरवर केवळ आरोप केले. मात्र, शूटर नवाबच्या पथकाने परिसरात मुक्काम ठोकून टी-वन वाघिणीचा बंदोबस्त केल्यामुळे सत्काराचे आयोजन केले,' असे ग्रामस्थांनी सांगितले.