यवतमाळ- जिल्ह्यातील राळेगाव मधील झोटींगधरा शाळेचे छत पाच वर्षापूर्वी वादळात कोसळले. आज पाच वर्षे उलटून गेले तरी अजूनही कोणी लक्ष दिलेले नाही. पण अशा परिस्थितीतही या शाळेतील शिक्षिका एकच वर्गखोली आणि व्हरांड्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
झोटींगधरा हे गाव शंभर टक्के आदिवासी असणारे कोलाम समाजातील लोकवस्तीचे गाव आहे. इथे वर्ग एक ते चार पर्यंत 30 विद्यार्थी शिक्षण घेतात. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीने जिल्हा परिषदेने शाळा उघडल्या खऱ्या, मात्र शाळेची अवस्था कशी आहे याकडे वर्षानुवर्षे कोणीच पाहत नाही. झोटींगधरा शाळेचे छत पाच वर्षापूर्वी वादळात उडून गेले. वारंवार तक्रार, अर्ज, विनंत्या करूनही या शाळेकडे कोणीही लक्ष दिले नाही. आता या शाळेच्या वर्गखोली मध्ये 7 ते 8 फूट उंच झाड तयार झाले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गखोलीत आणि व्हरांड्यात शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत.