यवतमाळ -विधानपरिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक येत्या 31 जानेवारीला होणार असून या निवडणुकीसाठी 490 मतदारांची प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा -वणी पंचायत समिती: सभापती भाजपचा तर उपसभापती भाकपचा
ऑक्टोबर 2016 मध्ये प्रा. तानाजी सावंत हे या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते भूम परांडा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्याने त्यांनी 24 ऑक्टोबर 2019 रोजी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत असून या निवडणुकीचा कार्यकाल हा 5 डिसेंबर 2022 पर्यंत राहणार आहे.
हेही वाचा -यवतमाळमध्ये अवकाळी पावसासह गारपीट, तीन तालुक्यांना बसला मोठा फटका
या पोटनिवडणुकीसाठी नगरपालिकांचे 283 नगरसेवक, नगरपंचायतीचे 130 नगरसेवक, 61 जिल्हा परिषद सदस्य, 16 पंचायत समिती सभापती असे एकूण 490 मतदार मतदान करणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी असल्याने या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाकडे एकच उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर भाजप आपला स्वतंत्र उमेदवार लढविणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे.